तयारी, अंमलबजावणीसाठी स्वतंत्र गट

सोमवार, 20 ऑगस्ट 2018

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह अन्य हत्यांच्या कटात तयारी करणारा आणि अंमलबजावणी करणारे, असे स्वतंत्र गट निर्माण केले होते. त्यात कडव्या उजव्या विचारांच्या घटकांना सहभागी करून घेण्यात आले, असे केंद्रीय आणि राज्य तपास संस्थांच्या तपासात उघड झाले आहे. कडव्या विचारसरणीच्या स्लीपर सेलवर आता तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र एटीएस एकत्रितपणे काम करीत आहेत. सीबीआयही त्यात आता सहभागी झाली आहे. 

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकरांसह अन्य हत्यांच्या कटात तयारी करणारा आणि अंमलबजावणी करणारे, असे स्वतंत्र गट निर्माण केले होते. त्यात कडव्या उजव्या विचारांच्या घटकांना सहभागी करून घेण्यात आले, असे केंद्रीय आणि राज्य तपास संस्थांच्या तपासात उघड झाले आहे. कडव्या विचारसरणीच्या स्लीपर सेलवर आता तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र एटीएस एकत्रितपणे काम करीत आहेत. सीबीआयही त्यात आता सहभागी झाली आहे. 

सचिन अंदुरे : 
तपासाच्या चक्राला वेग

सचिनचे बालपण धावणी मोहल्ल्यात गेले असून, कपड्यांच्या दुकानात लेखापाल (अकाउंटंट) म्हणून काम करतो. याशिवाय लेखा परीक्षणाची (ऑडिट) इतर कामेही तो करायचा. दोन वर्षांपूर्वी त्याचा शीतलसोबत प्रेमविवाह झाला. त्यांना यावर्षी २२ फेब्रुवारीला मुलगी झाली. पंधरा जूनला तिचे नामकरण झाले. सचिन कुठेच जात नसे. शक्‍यतो अकोला येथे बहिणीकडेच जायचा, अशी माहिती शीतल अंदुरे यांनी दिली. त्याचा भाऊ प्रवीण हर्सूल येथे राहत असून, शिवाजीनगर भागातील एका पेट्रोलपंपावर कामाला असल्याची बाब कुटुंबीयांनी सांगितली.

सारंग अकोलकर - 
फरार असूनही पुण्यात वावर

सारंग अकोलकर २००९ मध्ये गोव्यात झालेल्या बाँबस्फोटानंतर फरारी आहे. त्याच्या अटकेसाठी तपास यंत्रणांनी बक्षीसही जाहीर केले आहे. त्याच्या पुण्यातील शनिवार पेठ येथील घरी सापडलेल्या कागदपत्रांत ‘धर्माचे रक्षण करायचे, शस्त्रसाठा उभारायचा, निधी संकलन करायचे आणि त्या माध्यमातून दुर्जनांचा नाश करायचा’, ‘देव न मानणारे काय उपयोगाचे, त्यांचे विचारही भ्रष्ट आहेत,’ अशा आशयाचे ‘साहित्य’ सापडले. त्यामुळे तपास यंत्रणा अचंबित झाल्या. अकोलकर फरार असला तरी त्यानंतरही त्याचा पुण्यात आणि परिसरात वावर होता. दहशतवादी कृत्यांचा कट रचण्यासाठी नव्या लोकांना ‘दादा’ म्हणून भेटविला जाणारा अकोलकरच असावा, असा तपास यंत्रणांचा संशय आहे.

वीरेंद्रसिंह तावडे : 
तपासाचा केंद्रबिंदू

डोळ्यांचा डॉक्‍टर असलेला वीरेंद्रसिंह तावडे पुण्यात येताना सातारा रस्त्यावरील एका केंद्रात तो मुक्काम करायचा. तेथे त्याची सारंग अकोलकरशी ओळख झाली. पाठोपाठ अमोल काळे, सचिन अंदुरे त्याच्या संपर्कात आले. तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार, हत्यांचे नियोजन आणि अंमलबजावणीत तावडे, अकोलकर आणि काळे आघाडीवर होते. इतरांना त्यांनी स्वत-ची नावेही कळू दिली नाहीत. गोपनीय पद्धतीने त्यांनी शस्त्रसाठा, निधी उभारणीस सुरवात केली. अंदुरे आणि त्याच्या साथीदाराला तावडेने हस्तकांच्या माध्यमातून जानेवारी ते जून २०१३ दरम्यान बेळगाव, हुबळी आणि औरंगाबाद परिसरात शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले; परंतु त्या दरम्यान त्यांना तावडेचे नाव माहिती नव्हते; तर त्याला ‘कोडवर्ड’ने ते ओळखत होते. सुधन्वा गोंधळेकर आणि संतोष कळसकरही तावडेच्या संपर्कात होते.

अमोल काळे - 
हिट लिस्ट पोलिसांच्या हाती

सारंग अकोलकर फरार झाल्यानंतर तावडे आणि काळे सक्रिय झाले. काळेचा कोल्हापूर आणि बंगळूर, हुबळी, धारवाड येथे वावर वाढला. गौरी लंकेश यांच्या खुनाचा तपास करताना कर्नाटक पोलिसांनी हत्यारे विकणाऱ्या टोळ्यांवर लक्ष केंद्रित केले. हुबळी, धारवाडमधील टोळ्यांमधील काही पंटरनी वर्णन केल्यावर काळेपर्यंत तपास पोचला. कर्नाटक एटीएसला काळेच्या घरी सापडलेल्या डायरीत महाराष्ट्रातील ११, तर कर्नाटकमधील २४ जणांची ‘हिट लिस्ट’ पोलिसांना सापडली. त्यात सांकेतिक नावांनी ‘टार्गेट’चा उल्लेख असून, सीबीआयच्या मुंबईतील एका अधिकाऱ्याच्याही नावाचा त्यात समावेश आहे. या तपासात तावडे, अकोलकर, काळे यांच्यातील ई मेलचाही मागोवा यंत्रणांना उपयुक्त ठरला.

श्रीकांत पांगारकर : 
कटास सहकार्य केल्याचा आरोप

श्रीकांत पांगारकर हा शिवसेनेच्या तिकिटावर दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आला होता. २००१ मध्ये गणपती गल्ली, भाग्यनगर, २००६ मध्ये जिल्हा परिषद कॉटर वार्डातून तो निवडून आला. २०११ मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्याने तो पक्षातून बाहेर पडला. पुढे हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून कामास सुरवात. काही काळ स्वस्त धान्य दुकानही चालविले.  पांगारकरच्या फेसबुक पेजवर काही हिंदुत्ववादी पोस्ट आहेत. 

दाभोलकर हत्येचा तपास
१६०० हून अधिक लोकांचे जबाब 
१२०० साक्षीदारांची तपासणी
१५ कोटी मोबाईल क्रमाकांची छाननी 
७७५६ या क्रमांकाच्या ९ हजार दुचाकी तपासल्या
२२ गंभीर गुन्हे या तपासादरम्यान उघडकीस

संशयित ‘फुटला’ अन्‌ कट उघड झाला 
वीरेंद्र तावडे २०१६ पासून अटकेत आहे. दाभोलकरांच्या खुनाबाबत दोघांकडेही यापूर्वी चौकशी झाली. तेव्हा त्यांनी पोलिसांना काही मागमूस लागू दिला नाही. नालासापोरा येथील शस्त्रसाठा प्रकरणातील संशयिताकडे पोलिसांनी चौकशी केली तेव्हा या खुनाचा धागा उलगडला. अंदुरेकडे झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशीत त्याने कबुली दिली अन्‌ कट उघड झाला.

तावडे, काळे यांनाही पुन्हा अटक 
दाभोलकर खून प्रकरणात तावडे, काळे, अकोलकर सामील असल्याचे यंत्रणांना दिसून आले आहे. त्यामुळे आता काळेला दाभोलकर प्रकरणात अटक करण्यासाठी सीबीआयचे पथक कर्नाटकला पोचले आहे. दोन दिवसांत काळे ताब्यात मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, तावडेलाही या गुन्ह्यात पुन्हा अटक होईल, अशी माहिती यंत्रणांमधील सूत्रधारांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

धागेदोरे जालन्यापर्यंत? 
जालना - औरंगाबाद एटीएसने शनिवारी (ता.18) जालन्यातून ताब्यात घेतलेला हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी श्रीकांत जगन्नाथ पांगारकर याला मुंबई एटीएसच्या स्वाधीन केल्याची सूत्रांची माहिती आहे. डॉ. दाभोलकर खून प्रकरणात वापरण्यात आलेली दुचाकी पांगारकर वापरत असल्याचाही संशय वर्तविण्यात येत असून, यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे जालन्यापर्यंत असल्याचे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 

एटीएसने शनिवारी (ता.18) जालना आरटीओ कार्यालयात दोन ते तीन दुचाकीच्या क्रमांकांची तपासणी केली. त्यापैकी एका दुचाकीची नोंद मिळाली नाही. तीच दुचाकी पांगारकरकडे होती. त्यानंतरच पांगारकरला जालन्यातील घरातून ताब्यात घेतले व घराची झाडाझडती घेण्यात आली, अशी माहिती आहे. 

- श्रीकांत पांगारकर हा शिवसेनेच्या तिकिटावर दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आला होता. 
- 2001 मध्ये गणपती गल्ली, भाग्यनगर, 2006 मध्ये जिल्हा परिषद कॉटर वार्डातून तो निवडून आला. 2011 मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्याने तो पक्षातून बाहेर पडला. 
- पुढे हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून कामास सुरवात. काही काळ स्वस्त धान्य दुकानही चालविले. 
- पांगारकरच्या फेसबुक पेजवर काही हिंदुत्ववादी पोस्ट आहेत. 
- जालना अंबड चौफुली भागातील महसूल कॉलनी येथे पांगारकरचे मूळ घर. 

पांगारकरचे तीन महिन्यांपासून औरंगाबादमध्ये वास्तव्य 
औरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात जालन्याचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याला शनिवारी (ता. 18) रात्री एटीएसने ताब्यात घेत त्याच्या जालन्यातील घराची झडती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून तो औरंगाबादमधील विभागीय क्रीडा संकुलासमोर असलेल्या ज्ञानेश्‍वरनगर येथे भाड्याच्या घरात राहत होता. पण, या ठिकाणी पांगारकर राहत नसून केवळ त्याची मुलगी, पत्नी आणि आई अशा तिघीच राहत असल्याचे घरमालकाने "सकाळ'ला सांगितले. 

शहरातील गारखेडा परिसरातील ज्ञानेश्‍वरनगरमधील गायकवाड यांच्या बंगल्यात पांगारकर तीन महिन्यांपासून वास्तव्यास असल्याचे सूत्रांनी सांगितले. या घराला रविवारी (ता. 19) कुलूप होते. याबाबत या बंगल्याच्या मालकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, पांगारकर याच्या अकरावीतील मुलीचा कोचिंग क्‍लास जवळच असल्याने ब्रोकरच्या मदतीने त्यांना तीन महिन्यांपूर्वी जूनमध्ये घर भाड्याने दिल्याचे त्यांनी सांगितले. आपण पांगारकरला कधीच पाहिले नाही; पांगारकर येथे राहत नव्हता. त्यामुळे त्याला येथून ताब्यात घेतले नसल्याचेही घरमालकाने स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Narendra Dabholkar murder case was formed and created an independent group of killers