हाताने मैला साफ करणारे "अदृश्‍य'

Swatch-Bharat-Abhiyan
Swatch-Bharat-Abhiyan

राज्यात 5,774 कर्मचारी; मुंबईत केवळ चार!
मुंबई - भर दुपारी 12 बारा वाजता नागपाड्यातील मदनपुरा गल्लीत तुंबलेल्या गटारातून सळईने काढलेली घाण हाताने काढत तो बसला होता. रस्त्यावरून जाणारे-येणारे त्या दुर्गंधीमुळे नाक बोटात धरून दूर पळत होते. तो मात्र तेथे उकिरड्यावर बसून ती घाण शांतपणे हाताने साफ करत होता...

इतके गलिच्छ काम कोणत्याही सुरक्षेशिवाय तो कसा करत असेल? त्याच्याच साथीदाराला विचारले. तो म्हणाला, तो काय करतोय हे कळायला तो शुद्धीत तरी हवा ना! दारूच्या नशेत कुणीही हे काम करू शकतो. नशा उतरल्यावर मात्र तो जेवूही शकत नाही. त्याच्या हाताचा वास पुढील चार दिवस जाणार नाही...

गांधी जयंतीनिमित्ताने देशभरात स्वच्छता सप्ताह सुरू असताना दक्षिण मुंबईतल्या नागपाड्यातले हे ताजे चित्र. तेथील निमुळत्या गल्ल्यांमधील दुर्गंधीयुक्‍त गटारे आणि गल्ल्या साफ करणारे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आपल्याला सहज दिसतात. या कामात किती कंत्राटी कामगार आहेत याची तर गणतीच नाही.

राज्य सरकारला मात्र हे दिसत नाही. राज्यात हाताने मैला साफ केला जात नसल्याचे सरकारने 2015 पूर्वीच जाहीर केले आहे. या दाव्याला छेद देतो तो निती आयोगाच्या आदेशानुसार केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने राज्यातील निवडक 14 जिल्ह्यांमध्ये हाताने मैला साफ करणाऱ्यांची माहिती गोळा करून बनविलेला अहवाल. त्यानुसार राज्यात हाताने मैला साफ करणारे कर्मचारी होते पाच हजार 774. ते पूर्वी काम करायचे, आता नाही, असा प्रशासनाचा बचाव आहे. कारण - असे कर्मचारी आढळल्यास प्रशासनातील प्रमुखावर गुन्हा दाखल होतो. त्यामुळे असे कर्मचारी नाहीतच, असे ठणकावून सांगितले जाते.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील "सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल एक्‍सक्‍लूजन अँड इनक्‍लूजिव्ह पॉलिसी' या विभागाचे प्रा. शैलेशकुमार दारोकार यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त केली. ते म्हणाले, ""राज्यात मैला उचलण्यासाठी शंभर टक्‍के यांत्रिकीकरण झाल्याचा सरकारचा दावा आहे का? मुंबई पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे बजेट 125 कोटींच्या आसपास असते. अर्थस्थिती इतकी चांगली असणाऱ्या महापालिकेत अशी परिस्थिती असेल तर अन्यत्र काय असेल? 5 हजार 774 हा आकडाही कमी आहे. या व्यवस्थेला त्यांच्याकडून गलिच्छ आणि मानहानी करून घेणारे काम करून घ्यायचे आहे, पण त्यांचं अस्तित्व मान्य करायचे नाही.''

हाताने मैला साफ करणारे
(केंद्रीय सामाजिक न्याय विभाग, राज्य सरकार आणि सामाजिक संस्थांची माहिती)

मुंबई - 4
सोलापूर - 433
नाशिक - 1139
जळगाव - 596
नंदूरबार - 127
धुळे - 232
औरंगाबाद - 1107
लातूर - 204
जालना - 293
अमरावती - 369
अकोला - 478
बुलडाणा - 119
वाशिम - 68
नागपूर - 605

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com