विनानोंदणी गाडी चालवणे फसवणूक नव्हे!

सुनीता महामुणकर 
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

नवीन गाडी नोंदणी न करता चालविली तरी त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालाद्वारे स्पष्ट केले आहे; मात्र नव्या गाडीची नोंदणी न करताच तिचा फेरफटका मारणाऱ्या युवकाला दंड ठोठावण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याच्यावर लावलेला फसवणुकीचा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे. 

मुंबई - नवीन गाडी नोंदणी न करता चालविली तरी त्यामुळे फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालाद्वारे स्पष्ट केले आहे; मात्र नव्या गाडीची नोंदणी न करताच तिचा फेरफटका मारणाऱ्या युवकाला दंड ठोठावण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्याच्यावर लावलेला फसवणुकीचा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे. 

ठाण्यात राहणाऱ्या एका युवकाने न्यायालयात याचिका केली आहे. ठाणे परिवहन विभागाने दाखल केलेला भा.दं.वि. कलम ४२० आणि ४६५ (फसवणूक आणि बोगस कागदपत्रे बनविणे) नुसारचा गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. एका अद्ययावत गाडीची त्यांनी खरेदी केली होती; मात्र या गाडीची रितसर नोंदणी परिवहन विभागाकडे केली नाही. त्यांच्या जुन्या गाडीचा नंबर नव्या गाडीवर लावून त्यांनी ती गाडी वापरायलाही सुरुवात केली होती. ठाणे परिवहन विभागाने गाडीची तपासणी केली तेव्हा फेब्रुवारीमध्ये हा प्रकार उघड झाला. याबाबत परिवहन विभागाने युवकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि त्याची गाडीही जप्त केली. याविरोधात त्याने याचिका केली होती. याचिकेवर न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. 

नोंदणीशिवाय गाडी चालविली आणि जुन्या गाडीची नंबरप्लेट लावली; मात्र बोगस कागदपत्रे तयार केली नाहीत, असा युक्तिवाद केला.

गाडीचा ताबा युवकाकडे
युवकाने कोणतीही बोगस कागदपत्रे तयार केली नाहीत; त्यामुळे त्याच्यावर कलम ४२०आणि ४६५ नुसार गुन्हा लागू होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच गाडीचा ताबा पुन्हा याचिकादाराला देण्याचे आदेश दिले. मात्र नोंदणीशिवाय गाडी वापरता कामा नये, असे आदेशही न्यायालयाने युवकाला दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Driving without registration is not a fraud