निकषांच्या बांधावर अडकणार दुष्काळ

drougth
drougth

सोलापूर - राज्यातील तब्बल १८० तालुक्‍यांमध्ये सध्या दुष्काळाचा ‘ट्रिगर २’ लागू करण्यात आला आहे. परंतु, उपग्रहाद्वारे दुष्काळाच्या निकषांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे निकषांची तंतोतंत जुळवणी करताना सध्याच्या १८० पैकी तब्बल ६७ तालुके दुष्काळी मदतीपासून वंचित राहतील, असा अंदाज सूत्रांकडून व्यक्‍त करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरपर्यंतच दुष्काळी मदत मिळणार आहे.

राज्यातील ३५५ तालुक्‍यांपैकी १४३ तालुक्‍यांत सरासरीच्या तुलनेत ५० ते ७५ टक्‍के पाऊस झाला आहे. दुसरीकडे २८ तालुक्‍यांत २५ ते ५० टक्‍के, तर १२१ तालुक्‍यांत ७५ ते १०० टक्‍के आणि ६३ तालुक्‍यांमध्ये १०० टक्‍क्‍यांहून अधिक पाऊस झाला आहे. त्यानुसार २०१ तालुक्‍यांमध्ये ट्रिगर १ लागू करण्यात आला होता. मात्र, उपग्रहांद्वारे निकष पडताळल्यानंतर त्यातून पुन्हा २१ तालुके वगळले. डिसेंबर २०१६ मधील दुष्काळाच्या केंद्र सरकारच्या निकषांचा फटका काही तालुक्‍यांना सोसावा लागणार आहे. ३१ ऑक्‍टोबरला राज्य सरकार दुष्काळाची घोषणा करेल.

१२ लाख शेतकरी राहणार वंचित
मॉन्सूनच्या प्रारंभी सर्वत्र चांगला पाऊस झाला. एक कोटी ३९ लाख ४० हजार ३११ हेक्‍टरपैकी सुमारे ८९ लाख हेक्‍टरवर पेरणी झाली होती. तसेच, एक कोटी ९१ लाख १०५ हेक्‍टर उसाच्या क्षेत्रापैकी ६४ टक्‍के क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात आली. परंतु, पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांची वाढ खुंटली व बहुतांशी पिके वाया गेली. मात्र, सुरवातीच्या काळातील माहितीचा विचार दुष्काळी मदतीसाठी केला जातो. सध्या पाण्याची पातळी घटली असली तरीही ऑक्‍टोबरची पाणीपातळी गृहीत धरली जाते. या सर्व निकषांमुळे राज्यातील ११ ते १२ लाख शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहतील, असा अंदाज सूत्रांकडून व्यक्‍त करण्यात आला.

...नाही तर राज्याबाहेर पडू
सोलापूर ः मंगळवेढा तालुक्‍यातील कायम दुष्काळी ४५ गावांना पुढील तीन महिन्यांत कोरडवाहू गावांचा दर्जा न दिल्यास महाराष्ट्र राज्यातून बाहेर पडण्याचा इशारा ४५ गावांनी दिला आहे. दुष्काळामुळे यंदाची दिवाळी साजरी न करण्याचा ठरावही या गावांनी मंजूर केला.

निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या मंगळवेढा तालुक्‍यातील ४५ गावांची बैठक नंदेश्वर येथे झाली. जनावरांना चारा मिळत नाही, फळबागांना टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या ४५ गावांतील लोकांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.सोलापूरातील कायम दुष्काळी व पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांची मुस्कटदाबी होत आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. 

मंगळवेढ्यातील निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कायम दुष्काळी ४५ गावांना कोरडवाहू गावे म्हणून जाहीर करून, त्या गावांना जास्तीत जास्त दुष्काळी मदत मिळवून देण्यासाठी केंद्रात पाठपुरावा करू.
- शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री

हेक्‍टरनिहाय मिळणारी मदत
कोरडवाहू - ६,८०० रुपये
बागायत - १२,५००
फळपिकांसाठी - १८,०००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com