#DraughtMaharastra ऐन हिवाळ्यातच दुष्काळाच्या झळा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील बिदाल या गावाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. मात्र मागील वर्षांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी पावसाअभावी गाव दुष्काळात होरपळून निघत आहे. 

पुणे - पावसाने पाठ फिरवली असल्याने ऐन थंडीच्या दिवसांत सातारा जिल्हातील माण आणि खटाव तालुक्‍याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. माण तालुक्‍यातील बिदाल या गावाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळविले आहे. मात्र मागील वर्षांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी पावसाअभावी गाव दुष्काळात होरपळून निघत आहे. 

बिदाल गावाने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकवर्गणी गोळा करून सुमारे 80 लाख रुपयांची जलसंधारणाची कामे केली होती. तसेच गावाच्या आजूबाजूच्या टेकड्यांवर गावातील नागरिकांनी आणि वनखात्याने सुमारे 27,000 वृक्षांची लागवड केली होती. या रोपांना जगविण्यासाठी शेजारच्या गावातून टॅंकरद्वारे पाणी देण्याची सोय गावकऱ्यांनी केली होती. मात्र यावर्षी दुष्काळाचे संकट पाहता पाण्याचे संकट गंभीर होत चालले आहे. त्यातून झाडांना पाणी देणे अवघड झाले आहे. पाण्याअभावी या झाडांना कसे वाचवायचे, असा प्रश्न आता गावकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. 

बक्षीसच ठरतेय अडचण 
सध्या गावाला दोन सरकारी टॅंकरद्वारे पाणी मिळत आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी अतिरिक्त टॅंकरची मागणी तहसील कार्यालयाकडे केली आहे. मात्र बिदाल गावाला पाणी फाउंडेशनचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले असल्याने टॅंकर मिळण्यात अडचणी येत आहेत. झाडांना उन्हाळा संपेपर्यंत पाणी देण्याची व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. 

""सरकारी सॅटेलाइट पाहणीत गाव हिरवेगार दिसते. त्यामुळे गावात दुष्काळ नाही असा निष्कर्ष काढत आहेत. मात्र प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. मोठ्या शेतकऱ्यांच्या डाळिंबांच्या बागा, तसेच इतर पिकांच्या शेतजमिनीमुळे गाव हिरवेगार दिसते. हे शेतकरी दुसऱ्या गावातून टॅंकरद्वारे पाणी आणून या बागा जगवत आहेत. मात्र गावातील सामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.'' 
- हनुमंत फडतरे, ग्रामपंचायत सदस्य, बिदाल. 

""यावर्षी दुष्काळ पडल्याने शेतीतही काम मिळेनासे झाले आहे. नोकरी करणारे पगारावर जगू शकतात. मात्र रोजंदारीवर काम करणाऱ्यांनी काय करायचे हा प्रश्न उभा आहे.'' 
- विश्वास माने, ग्रामस्थ, बिदाल. 

कटापूर योजना अद्यापही अपूर्णच 
जिहे कटापूर योजनेच्या माध्यमातून कायमच दुष्काळग्रस्त असणाऱ्या माण आणि खटाव तालुक्‍यातील गावांना दुष्काळमुक्त करण्याचा उद्देश होता. ही योजना 1995 मध्ये तत्कालीन युती सरकारने आणली होती. मात्र या योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे सध्यातरी येथील गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Web Title: drought in winter season