Breaking News : ‘कोरोना’च्या वाढत्या उद्रेकामुळे नाशिकचे मराठी साहित्य संमेलन स्थगित

marathi sahitya sammelan nashik
marathi sahitya sammelan nashik

औरंगाबाद  : नाशिक येथे दिनांक 26, 27, व 28 मार्च 2021 रोजी ठरलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय आज अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी जाहीर केला. कोरोनामुळे यंदा साहित्य संमेलन घ्यायचेच नाही असे महामंडळाने ठरविले होते पण नोव्हेंबर 2020 च्या मध्यापासून कोरोनाची लागण कमी कमी होत गेली. डिसेंबरपर्यंत ती पूर्णपणे आटोक्यात आली आणि महाराष्ट्राने ‘कोरोना’वर मात केली असे चित्र निर्माण झाले. ही बाब आणि रसिकांची मागणी व उत्सुकता लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नाशिकच्या ‘लोकहितवादी मंडळा’चे निमंत्रण स्वीकारून 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक 26, 27, व 28 मार्च 2021 ला नाशिक येथे घेण्याचे जाहीर केले होते.

नाशिकचे पालकमंत्री ना. श्री. छगन भुजबळ यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून संमेलनाची जोरदार तयारी सुरू केली होती. निधी संकलन व इतर तयारीला वेग आला असताना ध्यानीमनी नसताना अचानक ‘कोरोना’ने पुन्हा डोके वर काढले. साहित्य महामंडळाने व नाशिकच्या स्वागतमंडळाने कोरोना कमी होण्याची पुरेशी वाट पाहिली. परंतु तो कमी होण्याची चिन्हे दिसेनात; वरचेवर त्याचा वाढता प्रभाव पाहून साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी उपाध्यक्षांसह आपल्या सहकारी पदाधिका-यांशी आणि महाराष्ट्रातील चार प्रमुख साहित्य संस्थांच्या पदाधिका-यांशी चर्चा केली.      साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. श्री. छगन भुजबळ यांच्याशी फोनवर सर्व बाजूने चर्चा केली. नाशिकच्या निमंत्रक संस्थेचे अध्यक्ष श्री. जयप्रकाश जातेगावाकर यांच्याशी चर्चा केली आणि महाराष्ट्रभरातून व नाशिकमधून येणा-या रसिकांच्या आणि संमेलनाध्यक्षांसह भारतभरातून येणा-या निमंत्रित लेखक - कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून 26, 27, व 28 मार्च 2021 या तारखांना ठरलेले हे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.   तूर्त हे संमेलन रद्द करण्याऐवजी स्थगित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. ‘कोरोना’ ही नैसर्गिक आपत्ती आहे.

या आपत्तीवर कोणाचेही नियंत्रण नाही म्हणून कोरोनाचा प्रभाव ओसरल्यावर नाशिकच्या स्वागतमंडळाला साहित्य महामंडळाशी चर्चा करून हे संमेलन घेता येईल असेही श्री. कौतिकराव ठाले पाटील यांनी स्पष्ट केले. मात्र स्थगित संमेलनाचे अध्यक्ष, मावळते अध्यक्ष आणि सर्व निमंत्रित साहित्यिक यात कोणताही बदल केला जाणार नाही. हे संमेलन मे 2021 च्या आत स्वागतमंडळाने घ्यावे अशी महामंडळाची अपेक्षा आहे. हे संमेलन स्थगित करताना महाराष्ट्र शासनासह सर्व घटकांचा विचार साहित्य महामंडळाने केला आहे असेही एका प्रश्नांच्या उत्तरात ठाले पाटील यांनी सांगितले. शेवटी संमेलनाशी संबंधित सर्व घटकांना, निमंत्रित लेखक - कवींना, स्वागतमंडळाच्या पदाधिका-यांना व सभासदांना, साहित्य महामंडळाच्या सर्व सहका-यांना आणि प्रकाशक - ग्रंथविक्रेत्यांना तसेच नाशिककरांना, आपण आपली काळजी घ्या, संमेलन होईल, नाही तर होणारही नाही, ते आपणा सर्वांपेक्षा महत्त्वाचे नाही असे काळजीपूर्ण आवाहनही त्यांनी सर्वांना केले.

       गोखले एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गोसावी सर आणि त्यांच्या संस्थेचा सर्व परिवार आणि महाराष्ट्र शासनाचे स्थानिक प्रशासन यांनी या संमेलनासाठी साहित्य महामंडळाला व स्वागतमंडळाला जे अतुलनीय सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.  
           
         पुस्तक प्रदर्शनासाठी ज्यांनी गाळ्यांचे भाडे भरले असेल ते पैसे त्यांना स्वागतमंडळाकडून परत घेता येतील किंवा संमेलन होईपर्यंत स्वागतमंडळाकडेच ठेवता येतील. याचा निर्णय प्रकाशक व पुस्तक विक्रेते यांनी स्वत: च घ्यावयाचा आहे.

        यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष            डॉ. रामचंद्र काळुंखे आणि ग्रंथप्रदर्शन समितीचे सदस्य श्री. कुंडलिक अतकरे हे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com