भक्तांच्या महापुराला मुकली चंद्रभागा 

शंकर टेमघरे / विलास काटे - सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने पायी वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला; तसेच संतांच्या पादुका थेट पंढरीला नेण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार, संतांच्या पादुकांसाठी एसटी बस देण्यात आल्या.

पंढरपूर - ‘पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी’ अशी महती असलेल्या पंढरीचे रूप आज पालटले होते. राज्यातील सकल संतांच्या पादुका पंढरीत वारीसाठी आल्या, पण त्यांच्यासमवेत दरवर्षी असलेला भक्तांचा प्रवाह नसल्यामुळे चंद्रभागेला जणू भाविकांची ओहोटी आल्यासारखे वाटत होते. 

आषाढी वारीसाठी प्रमुख सात संतांच्या पादुका मोजक्‍या वारकऱ्यांसमवेत मंगळवारी रात्री उशिरा दाखल झाल्या. मात्र लाखो वारकऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे पंढरीला भक्तिरंग आला नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने पायी वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला; तसेच संतांच्या पादुका थेट पंढरीला नेण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार, संतांच्या पादुकांसाठी एसटी बस देण्यात आल्या. त्यात प्रत्येकी वीस वारकऱ्यांना परवानगी दिली होती. सर्व संतांच्या पादुकांनी परंपरेनुसार आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले, पण नंतर त्या तेथेच थांबल्या होत्या. मंगळवारी सकाळपासून संतांच्या पादुका त्यांच्या ठिकाणावरून एसटीने वाखरी येथे आणण्यात आल्या. तेथेही सोबत आलेल्यांची आरोग्य तपासणी झाली. वाखरीच्या तळाला छावणीचे स्वरूप आले होते. सरकारच्या वतीने सर्व नियोजन केले होते. दरवर्षी वाखरीत सर्व संतांचा मेळा भरतो. यंदा राज्यातील नऊ संतांच्या पादुकांनाच वारीसाठी परवानगी दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

सर्वांत लांबचा प्रवास असलेल्या संत मुक्ताईंच्या पादुका पहाटे चार वाजता मुक्ताईनगरमधून मार्गस्थ झाल्या होत्या. आळंदीतून माउली तर देहूतून तुकोबारायांच्या पादुका दुपारी एकला निघाल्या. सर्वच मार्गांवर भाविकांनी संतांच्या दर्शनासाठी दुतर्फा गर्दी केली होती. या सर्व बस फुलांनी सजविल्या होत्या. सोबत कडेकोट पोलिस बंदोबस्त होता. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांसमवेत बसमध्ये मालक रामभाऊ आरफळकर, प्रमुख विश्वस्त विकास ठगे, सोहळाप्रमुख देसाई, बाळासाहेब चोपदार होते, तर संत तुकाराम महाराज पादुकांसमवेत विश्वस्त मंडळ आणि वारकरी होते. अन्य संतांच्या पादुकांसमवेत संस्थानचे पदाधिकारी तसेच वारकरी होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पंढरी सुनीसुनी
दशमीला दरवर्षी अनेक संतांच्या समवेत सुमारे दहा लाख भाविक पंढरीत येतात. यंदा कोरोनामुळे ठराविक वाहनांमधून हरिनामाचा गजर करीत मोजके वारकरी आल्याने पंढरीचे रूपच पालटले. पंढरी सुनीसुनी होती. चंद्रभागेचा तीर रिकामा होता. पंढरपूरमध्ये संचारबंदी लागू केल्याने रस्ते ओस पडले होते. जेथे या दिवशी रस्त्यावर चालणे शक्‍य नसते, तेथे शांतता होती. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to the corona there is no crowd of devotees at Chandrabhaga