सह्याद्रीच्या उतारावर मॉन्सूनचा जोर नाहीच; धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची ओढ

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 29 July 2020

महाराष्ट्रातील पुणे विभागात सर्वांत कमी ७१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नाशिक विभागात ११५ टक्के तर अमरावती विभागात १०९.२ टक्के पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.  

पुणे - मॉन्सूनचा निम्मा हंगाम संपत आला आहे. मात्र, दरवर्षी कोकणासह घाटमाथा आणि सह्याद्रीच्या पूर्व उतारावर असलेल्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने यंदा ओढ दिली आहे. या भागात जुलै महिन्यात मॉन्सूनने जोर धरला नसल्याचे चित्र आहे. राज्यातील सर्वाधिक पावसाच्या तालुका असलेल्या मुळशीत (जि. पुणे) यंदा १८.८ टक्के पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. 

कृषी विभागाच्या महावेध प्रकल्पाअंतर्गत ही माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे दुष्काळी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील कोरडवाहू असलेल्या तालुक्यामध्ये यंदा मॉन्सून दमदार बरसला आहे. तर दरवर्षी मुबलक पाऊस देणाऱ्या सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. यामुळे मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झालेली नाही. जून महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे जवळपास सर्व तालुक्याची सरासरी भरून आली, राज्यातील केवळ १२ तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला होता. जुलै महिन्यात घाटमाथ्यालगतच्या तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने ४० तालुक्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे. यात विदर्भातील १० मराठवाड्यातील एका तालुक्याचा समावेश आहे. २९ तालुके मध्य महाराष्ट्र व कोकणाच्या घाटमाथ्याजवळील आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मराठवाड्यात सर्वाधिक, पश्चिम महाराष्ट्रात सर्वांत कमी 
एक जूनपासून २८ जुलैपर्यंत राज्यात ४९२.६ मिलिमीटर (९७.३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. यात सहा कृषी विभागानुसार मराठवाडा विभागात १२७ टक्के तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे विभागात सर्वांत कमी ७१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नागपूर विभागात ८२ टक्के तर कोकण विभागात ८४.५ टक्के पाऊस पडला आहे. नाशिक विभागात ११५ टक्के तर अमरावती विभागात १०९.२ टक्के पावसाची नोंद झाल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलेले तालुके
    ठाणे : मुरबाड, शहापूर
    रायगड : कर्जत, खालापूर, सुधागडपाली, महाड, 
    पालघर : मोखाडा, 
    नाशिक : सुरगाणा, इगतपुरी, पेठ, त्र्यंबकेश्वर, 
    नंदुरबार : नवापूर, तळोदा, 
    पुणे : पुणे शहर, मुळशी, भोर, वेल्हा, आंबेगाव, 
    सातारा : पाटण, महाबळेश्वर,
    कोल्हापूर : पन्हाळा, शाहुवाडी, राधानगरी, बावडा, चंदगड, 
    लातूर : शिरूर अनंतमाळ, 
    अकोला : बार्शी टाकळी, 
    अमरावती : चिखलदरा,
    भंडारा : पवनी, लाखंदूर,
    गोंदिया : आमगाव, सालकेसा,
    चंद्रपूर : ब्रह्मपुरी,
    गडचिरोली : धानोरा, कोर्ची.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to low rainfall there has been no increase in water from dams in Maharashtra