जेजुरीत रंगला १७ तास दसरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

जेजुरी - जेजुरीत दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी पालखी सोहळा, देवभेट, खंडा उचलणे स्पर्धा, रावण दहन, धनगरी ओव्या, कलावंतांची हजेरी, असे कार्यक्रम झाले. 

कडेपठारच्या डोंगरात मध्यरात्री देवभेट सोहळा झाला, त्या वेळी फटाक्‍यांची व शोभेच्या दारूची आतषबाजी आणि भंडाऱ्याची उधळण करीत नागरिकांनी एकमेकांना आलिंगन दिले. कडेपठारच्या डोंगररांगांना जागविणाऱ्या मर्दानी दसऱ्याची शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सतरा तासांनी सांगता झाली.

जेजुरी - जेजुरीत दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी पालखी सोहळा, देवभेट, खंडा उचलणे स्पर्धा, रावण दहन, धनगरी ओव्या, कलावंतांची हजेरी, असे कार्यक्रम झाले. 

कडेपठारच्या डोंगरात मध्यरात्री देवभेट सोहळा झाला, त्या वेळी फटाक्‍यांची व शोभेच्या दारूची आतषबाजी आणि भंडाऱ्याची उधळण करीत नागरिकांनी एकमेकांना आलिंगन दिले. कडेपठारच्या डोंगररांगांना जागविणाऱ्या मर्दानी दसऱ्याची शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सतरा तासांनी सांगता झाली.

गडावरील पालखी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता पेशव्यांनी इशारा देताच खांदेकऱ्यांनी उचलली. या वेळी मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, गणेश आगलावे, राजकुमार लोढा, शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, अशोक संकपाळ, प्रसाद शिंदे, तुषार सहाणे  व ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. पालखी प्रदक्षिणा सुरू असताना भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता. पालखी महाद्वारातून बाहेर येताना भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर पालखी सुसरटींगीच्या टेकडीवर आणण्यात आली. कडेपठारच्या पालखीचे रात्री नऊ वाजता प्रस्थान झाले. त्या वेळी पावसाने हजेरी लावली. पंधरा दिवसांनंतर पाऊस पडल्याने खांदेकरी मानकरी व ग्रामस्थांचा उत्साह दुणावला. सुरसरटिंगीवर साडेअकरा वाजता पालखी पोचली. मध्यरात्रीअडीच वाजता डोंगर माथ्यावर असलेल्या कडेपठराच्या पालखीतील देव व डोंगर पायथ्याला असलेल्या गडावरील पालखीतील देव यांची मध्यरात्री अडीच वाजता आरशात देवभेट झाली. त्यानंतर गडावरील पालखी जुनी जेजुरीमार्गे गावात आली, तर कडेपठारची पालखी साडेपाच वाजता मंदिरात पोचली.

जेजुरी शहरात पालिकेच्या समोर उभारलेल्या रावणाचे दहन करण्यात आले. त्यानंतर महाव्दार रस्त्याने पालखी गडावर आणण्यात आली. गडावर पालखी मंदिरप्रदक्षिणा घेऊन रोजमारा (धान्य) वाटून पालखी सोहळ्याची सांगता झाली. कलावंतांनी पालखी पुढे सेवा सादर केली; तर घडशी बांधवांनी सनई-चौघडा वाजविला. एका हाताने तलवार उचलण्याच्या स्पर्धेत रमेश दत्तात्रेय शेरे (१४.११ मिनिट) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. सचिन गोरख देशमुख (१३.४६ सेकंद) यांनी व्दितीय, तर अंकुश सुधाकर गोडसे (१२. ३५) यांनी तृतीय क्रमांक मिळविला. अमोल खोमणे (१०. ५१) व विजय कामथे (४.२७) सेंकद तलवार उचलून धरून उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. कसरतीच्या स्पर्धेत शिवाजी राणे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. नितीन कुदळे, अक्षय गोडसे यांनी अनुक्रमे व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविला. सचिन कुदळे, मंगेश चव्हाण यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. राजकुमार लोढा, शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, अशोक संकपाळ, प्रसाद शिंदे, तुषार सहाणे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

Web Title: Dussehra celebrates in traditional in Jejuri