धार्मिक औदार्य देणार राजसत्तेला बळ?

धार्मिक औदार्य देणार राजसत्तेला बळ?

जामखेड (जि. नगर) -  वैकुंठवासी संत भगवानबाबांच्या भगवानगड कर्मभूमीतील बंद झालेल्या दसरा मेळाव्याची प्रथा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली आहे. संत भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगाव घाट (ता. पाटोदे) येथे हा  मेळावा सुरू करत त्यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेली ३५ वर्षांपासूनची परंपरा जपली. हे येथील मेळाव्याचे दुसरे वर्ष आहे. सावरगावला संत भगवानबाबांचे स्मारक  उभारून त्यांनी लाखो भक्तांची मने जिंकलीच; मात्र त्यांचे हे धार्मिक औदार्य त्यांच्या राजसत्तेला अधिक बळ देणारे ठरणार असल्याचे  दिसत आहे. 

दसऱ्या निमित्ताने दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊसतोडणी कामगारांच्या कष्टातून उभ्या राहिलेल्या भगवानगडावर ‘दसरा मेळावा’ होऊ लागला. तो राज्याचे लक्ष वेधणारा ठरला. ऊसतोडणी कामगारांसाठी भगवानगड हे स्फूर्ती व शक्तिस्थळ बनले. 

मुंडे यांच्या निधनानंतर वंजारी समाजाचे नेतृत्व पंकजा यांच्या खांद्यावर येऊन पडले. पंकजांनी वडिलांचा राजकीय वारसा व समाजाचे नेतृत्व स्वीकारले. ‘रडणार नाही, आता लढणार’ म्हणत पंकजा यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून दिले.

जागा बदलणार, झंझावात तोच!
भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री महाराजांनी यापुढे गडावरून राजकीय भाषणबाजी होणार नसल्याचे गेल्या वेळी दसरा मेळाव्यापूर्वी जाहीर करत पंकजा यांना गडावर बोलण्यास विरोध दर्शविला. प्रशासनानेही मेळाव्यास परवानगी नाकारली होती. त्यानंतर पंकजा यांनी गडाच्या पायथ्याशी दसरा मेळावा घेतला आणि तो यशस्वीही झाला. गडावरचा ‘संघर्ष’ टाळण्यासाठी पंकजा यांनी या वर्षी भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगावला मेळावा घेण्याचे नियोजन केले. 

निवडणुकांपूर्वी मेळावा चर्चेत
गेल्या वर्षी दसऱ्याच्या अगोदर अवघे दोन दिवस मेळाव्याचे ठिकाण जाहीर झाले होते, तरी त्यासाठी लाखोंचा जनसागर लोटला होता. या वर्षीचा मेळावा नियोजित असून, यानिमित्ताने खास व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा जास्त संख्येने भक्त येण्याची शक्‍यता गृहीत धरून नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आगामी निवडणुकांपूर्वी हा मेळावा होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांचे डोळे त्याकडे लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com