फडणवीसजी, तुम्ही दिल्लीला गेल्यास सर्वांत जास्त आनंद मुनगंटीवारांना : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 March 2020

अर्थसंकल्पासारख्या विषयावर कधीही बोलण्याची वेळ येईल असं वाटलंही नव्हतं पण देवेंद्रजी तुमच्यामुळेच माझ्यावर ही वेळ आली असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फडवणीस यांना लगावला.

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस यांना ‘तुम्ही साहित्यिक होऊ शकता’ असा चिमटा काढत राजकारण सोडून साहित्यिक झाला तर आम्हालाही सुगीचे दिवस येतील, असा टोला लगावला. दिल्लीच्या राजकारणात उत्तम साहित्यिक आणि राजकारणी म्हणून तुमच्यासारख्या नेत्याची गरज आहे. तेव्हा तुम्ही दिल्लीला जायला हवे, त्याचा 288 आमदारांना आनंद होईल, असे म्हणत, सर्वात जास्त आनंद हा सुधीर मुनगंटीवार यांना होईल, अशी मार्मिक टिपण्णी अजित पवार यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये देवेंद्र फडवणीस लिखित अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनीही फडवणीस यांना मार्मिक चिमटे काढत कोपरखळ्या मारल्या. 

अर्थसंकल्पासारख्या विषयावर कधीही बोलण्याची वेळ येईल असं वाटलंही नव्हतं पण देवेंद्रजी तुमच्यामुळेच माझ्यावर ही वेळ आली असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फडवणीस यांना लगावला. मला अर्थसंकल्पातील फार काही कळत नाही म्हणून तुमचा मित्र म्हणून तुम्ही माझ्यासाठीच हे सोप्या भाषेतील पुस्तक लिहिले असे मी मानतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: DY CM Ajit Pawar talked about Devendra Fadnavis and Sudhir Mungantiwar