यवतमाळ, नांदेड भूकंपाने हादरले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

- रात्री सव्वानऊच्या सुमारास जाणवले भूकंपाचे धक्के.

महागाव (जि. यवतमाळ) : यवतमाळ व नांदेड जिल्ह्याला आज (शुक्रवार) रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या धक्‍क्‍यांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले व घराबाहेर पडले. जीवितहानीची कोणतीही माहिती नसली तरी काही ठिकाणी घरांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव, उमरखेडसह नांदेड जिल्ह्यातील माहूर, किनवट, हिमायतनगर, अर्धापूर व नांदेड शहराचा तरोडा बुद्रुक परिसराला रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. याबाबत शासकीय पातळीवर नोंद झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही. भूकंपामुळे काही घरांना तडे गेले आहेत. महागाव तालुक्‍यातील, डोंगरगाव, हिवरा, फुलसावंगी, वरोडी, पोहंडुळ, धनोडा, पेढी, काळी दौ., बोरी इजारा, साई, करंजखेड, कासारबेहळ, काळी टेंभी, चिल्ली व अन्य गावांत हादरे जाणवले. यामुळे नागरिकांची एकच धावपळ झाली. अनेकांच्या घरातील भांडी पडली तर काही गावांतील घरावरील पत्रे हलल्याने नागरिक भयभीत झाले.

दरम्यान, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, भूकंपाचे धक्के जाणवलेली गावे पैनगंगा नदीखोऱ्यातील आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Earthquake in Yavatmal and Nanded