सव्वादोन कोटींचे हातावर पोट

तात्या लांडगे
बुधवार, 11 जुलै 2018

राज्यातील शहरी भागाचे चित्र; सुशिक्षित बेकारांची संख्या वाढती

राज्यातील शहरी भागाचे चित्र; सुशिक्षित बेकारांची संख्या वाढती
सोलापूर - देशातील गोरगरीब कुटुंबांसाठी केंद्र सरकारतर्फे आयुष्यमान भारत योजना राबविली जात आहे. त्यासाठी देशातील सुमारे दहा कोटी गरीब व दुर्बल घटक पात्र ठरणार आहेत. त्यासाठी सामाजिक-आर्थिक जातीय जनगणनेचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात शहरी भागातील तब्बल दोन कोटी 33 लाख 47 हजार 329 लोकांचे हातावर पोट असल्याची माहिती उघड झाली आहे.

देशातील विविध राज्यांमध्ये रस्ते, उद्योगधंदे झपाट्याने वाढत आहेत. मात्र, दुसरीकडे डिजिटीलायझेशन व आधुनिक तंत्रज्ञानामुळे रोजगार निर्मितीचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. वाळूटंचाईमुळे बांधकामे ठप्प असल्याने कामगारांच्या हाताला काम नाही, तर दुसरीकडे नोकरीअभावी सुशिक्षित बेकारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याची चर्चा आहे.

शेतमालाला रास्त दर नसल्याने शेतकऱ्यांमध्येही त्या व्यवसायाविषयी नाराजी आहे. 2020 पर्यंत भारत जागतिक महासत्ता होईल, असे स्वप्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पाहिले होते. परंतु, सद्य:स्थिती पाहता ते कधीपर्यंत पूर्ण होईल, याबाबत आता कोणताही घटक स्पष्टपणे बोलू शकत नाही. खेडी स्वयंपूर्ण झाल्याशिवाय प्रगती अशक्‍य आहे. त्यादृष्टीने गावातील लोकांच्या गरजा ओळखून गावातच उद्योगधंदे सुरू करण्याचे आवाहन जनतेला करण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी सरकारच्या वतीने ठोस यंत्रणा कार्यान्वित करण्याची सध्या मोठी गरज निर्माण झाली आहे.

राज्यातील स्थिती
- बांधकाम कामगार : 1,02,35,435
- कचरा वेचक : 23,825
- भिकारी : 47,371
- घरकाम करणारे : 6,85,352
- विक्रीते, फेरीवाले, गटई कामगार : 8,64,659
- झाडू मारणारे, सफाई कामगार : 6,06,446
- घरातून काम करणारे, कारागीर : 27,58,194
- वाहतूक संबंधीचे कामगार : 27,73,310
- दुकानात मजुरी करणारे : 36,93,042
- वीजतंत्री : 11,99,362
- धोबी, पहारेकरी : 4,60,433
एकूण : 2,33,47,429

Web Title: Educated Unemployed poor family employment