भावी शिक्षकांकडून "शिक्षण'ला मिळाले 102 कोटी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 डिसेंबर 2018

मागासवर्गीय कक्षाकडून रोस्टर तपासणी नाही, भरतीला लागणार विलंब

सोलापूर- मागील आठ- दहा वर्षांपासून राज्यातील शिक्षक भरती रखडली आहे. दुसरीकडे शिक्षक होण्याकरिता राज्यातील 11 लाख 83 हजार 177 विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षेकरिता तब्बल 102 कोटी रुपयांचे शुल्क भरले आहे. मात्र, अद्यापही शिक्षक भरतीला मुहूर्त लागलेला नाही. जानेवारीपर्यंत शिक्षक भरती होईल असे जाहीर केले; परंतु जिल्हा परिषद शाळांसह खासगी संस्थांचे रोस्टर अपूर्ण असल्याने ते पडताळणीसाठी मागासवर्गीय कक्षाकडे अद्यापही गेलेले नाही, त्यामुळे शिक्षक भरती आणखी लांबणीवर पडेल, असे शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्यातील विविध शाळांमध्ये 24 हजार शिक्षकांची भरती होणार आहे. परंतु, पटसंख्येअभावी शाळांची संख्या कमी होत असून, अतिरिक्‍त शिक्षकांची संख्या सद्यःस्थितीत साडेपाच हजार झाली आहे. त्यांचे समायोजन टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे राज्यातील सुमारे सव्वा लाख भावी शिक्षकांनी पोर्टलवर अर्ज केले. मात्र, राज्यातील बहुतांशी संस्थांचे रोस्टरच राज्याच्या शिक्षण विभागाकडे न आल्याने भरती केव्हा होणार, याबाबत संभ्रम कायम आहे. दरम्यान, भावी गुरुजींना आता आचारसंहितेची भीती वाटू लागल्याचे दिसून येते.

एसईबीसी अपडेशनसाठी आज अंतिम मुदत 
मराठा आरक्षणानंतर टीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर एसईबीसी संवर्ग अपडेट करण्याकरिता 30 डिसेंबरची मुदत दिली आहे. पवित्र पोर्टलच्या अडचणी सोडविण्यासाठी शिक्षण आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. परंतु, वारंवार सर्व्हर डाउन होत असल्याने अर्जदारांची धावपळ पाहायला मिळत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी भावी शिक्षकांकडून होत आहे. 

जिल्हा परिषद शाळांसह खासगी शिक्षण संस्थांचे रोस्टर पूर्ण झाल्यानंतर ते फेरपडताळणीसाठी मागासवर्गीय कक्षाकडे जाईल. त्यानंतर भरतीचा मार्ग मोकळा होणार असून, त्यासाठी किती कालावधी लागेल, हे निश्‍चित सांगता येणार नाही. - चारुशीला चौधरी, उपसचिव, शिक्षण विभाग

Web Title: For Education received 102 crores from future teacher