"ती'ला सक्षम करण्याची मानसिकताच हवी! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

अडथळे कशामुळे? 
- मुलींना शिकवून काय उपयोग, हा विचार आजही पालक करतात. 
- बारावीपर्यंत शिक्षण मोफत असले, तरीही शाळेचे लांबचे अंतर गाठण्यासाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न. 
- शाळा दूर असल्यास सुरक्षेचा प्रश्न 
- आई-वडील कामाला जाणारे असतील, तर लहान भावंडांना सांभाळण्यासाठी थोरल्या मुलीची शाळा सुटते. 
- बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत असले, तरीही पुढच्या शिक्षणासाठी पालकांकडे पैसा नसतो. 
- आजही ग्रामीण भागात बालविवाहाची प्रथा सुरूच. 

मुंबई - अत्याचारातून गर्भवती राहिल्याने तिला संस्थेत आणले गेले; मात्र तिच्या कागदोपत्री वयाबद्दल संस्थेतल्या अधिकाऱ्यांना शंका आली. 15 वर्षांची दिसणारी मुलगी 18 वर्षांची कशी असू शकेल, या शंकेवरून संस्थेतील अधिकाऱ्यांनी तिला प्रश्न विचारले. "माझं वय 15... शिक्षण चौथी...' या उत्तरावरून सखोल चौकशी करण्याचा अधिकाऱ्यांचा निर्णय पक्का झाला. 

चौकशी करताना कळले, की शाळेत तिला सातवी उत्तीर्ण असल्याचा शेरा दिला आहे. तिने मात्र चौथीतच शाळा सोडल्याचे सांगितले. शाळाबाह्य मुलांच्या शोधयात्रेतून वाचवण्यासाठी शिक्षकांनीच तिला कागदोपत्री सातवीपर्यंत ढकलले होते. 

दुसऱ्या एका घटनेत घरकामगार मुलीची सुटका करून आश्रमात आणले गेले. काही वर्षे ती घरकामगार म्हणून त्या घरातच राहत होती. शाळेत मात्र तिची दररोजची हजेरी लावली जात होती. इथेही शिक्षण विभागाच्या जाचातून मुक्त होण्यासाठी शिक्षकांनी हीच शक्कल लढवली होती. शहापूर जिल्ह्यातील या दोन्ही घटना. 

समाजसेविका ज्योती पाटकर म्हणतात, ""कायद्याचे पाठबळ असले तरीही समाजातील शिक्षकांची मानसिकता जोवर बदलत नाही, तोवर मुली शिक्षणाविना राहण्याची ही परिस्थिती बदलणार नाही. मुलींना लिहिण्या-वाचण्यापुरते शिक्षण आले, की त्यांची शाळा आपोआप बंद होते. कुणी अगदी दहावीपर्यंत गेलीच, तर गावापासून महाविद्यालये दूर असतात. अशावेळी तिच्या महाविद्यालयापर्यंतच्या प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो आणि तिचे शिक्षण थांबते. यावर सरसकट उपाय म्हणून आजही मुलींचे वय 18 वर्षे पूर्ण होण्याअगोदरच लग्न लावले जाते. लग्नानंतर शिक्षण घेणे अगदीच दुर्मिळ. ही समाजातली मानसिकताच मुलींच्या शिक्षणातला सर्वांत मोठा अडथळा आहे.'' 

तिसरी घटना मात्र थोडी वेगळी कहाणी सांगते. घरातील तीन भावंडांमध्ये ती थोरली. पाठच्या तिन्ही भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तिने लहानपणापासूनच पेलली. आजारपणात वडिलांना गमावल्यानंतर आईने घरचा उंबरठा ओलांडला. आज तिला शाळा सोडून 13 वर्षे झाली. दोन्ही भावंडांचा सांभाळ करण्यात तिचे बालपण निघून गेले. त्याबद्दल तिची तक्रार नाही; पण गॅसवर स्वयंपाक करताना समोरच्या भिंतीवर लिहून शिकण्याची हौस ती भागविते. जमेल तसे शिकण्याचा तिचा ध्यास कायम आहे. तोडके मोडके का होईना, इंग्रजीतले शब्द बोलण्याचा ती प्रयत्न करते. आता लग्न होऊन स्वतःच्याच मुलाच्या संगोपनात ती गुंतली आहे. ""शिकले असते तर मीबी कामाला हापिसात गेले असते. पन आता माझी मुलगी शिकनारच,'' असे सांगत सकारात्मक भावनेने परिस्थितीशी लढण्यास ती सज्ज आहे. 

एकाच समाजातल्या या तिन्ही कहाण्या. मानसिकता बदलतेय की नाही हे आपल्या अनुभवावरून ठरवायचे; पण किमान आशेला जागा आहे, हेच यातून स्पष्ट होतेय. 

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात : 

मुलींच्या शिक्षणातील दुर्व्यवहाराला तिचे कुटुंब आणि समाज जबाबदार आहे. आजही माणसे परंपरा पाळण्याच्या नावाखाली मुलींवर असंख्य मर्यादा लादतात. त्यातूनच मुलींच्या शिक्षणाची नाळ तुटते. शिकलीस तर चांगला नवरा मिळेल, असा काहीसा नवा ट्रेंड; पण शिकण्याबाबतच्या मुलींच्या अभिलाषा मात्र ऐकल्या जात नाहीत. मुळात समाजाकडून मुलींना शिक्षणाच्या समान संधीच नाहीत. 
- शिक्षणतज्ज्ञ, रमेश पानसे 

राज्य सरकार मुलींच्या शिक्षणाबाबत कमी पडतेय. सरकारी पातळीवर मुलींच्या शिक्षणाबाबत प्रचंड उदासीनता आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण, इंदिरा गांधी बालिका योजनेव्यतिरिक्त मुलींच्या शिक्षणाकरिता खास योजना नाहीत. आदिवासी भागांत आजही मुलींना विद्यावेतन मिळत नाही. आवश्‍यक तरतुदींच्या अभावामुळे उच्च शिक्षणापासून अनेक मुली वंचित आहेत. कॉंग्रेस सरकारच्या राज्यात कस्तुरबा गांधी बालिका विद्यालये सुरू झाली खरे; परंतु ही वाढ आता दिसून येत नाही. मुलींना मोफत शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या वाढत नाही. 
- शिक्षणतज्ज्ञ, ज. मो. अभ्यंकर 

Web Title: Education Rights Day