मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे - डॉ. सदानंद मोरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Language

आपली मातृभाषा मराठी ही समृद्ध असून तिला २ हजार वर्षांचा संपन्न इतिहास लाभला आहे.

Marathi Language : मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे - डॉ. सदानंद मोरे

मुंबई - आपली मातृभाषा मराठी ही समृद्ध असून तिला २ हजार वर्षांचा संपन्न इतिहास लाभला आहे. मराठी भाषा आपले अस्तित्व अधोरेखित करणारी भाषा असल्याने तिचे जतन, संवर्धन करणे हे आपले कर्तव्‍य आहे. मराठी भाषेचे आपण वारसदार आहोत ही अभिमानाची बाब आहे. मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकला आहेच, आता त्यामध्ये आणखी वृद्धी होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले. महानगरपालिकेद्वारे आयोजित मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ कार्यक्रमादरम्यान उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

गेली अनेक वर्षे आपण मराठी टिकवली. मराठी भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र हे राज्य उदयास आले. पण इतकी वर्षे आपण मराठी टिकवली, मराठी वाढवली आणि राज्य आल्यानंतरही आपण नेमके कुठे मागे पडलो याचा विचार करणे गरजेचे आहे. म्हणूनच मराठी भाषेसाठी सर्वांनी मिळून एकत्रपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

मराठी भाषेला आपण ज्ञानभाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देत सर्व प्रकारच्या व्यवहारांच्या भाषेसाठी मराठी भाषेला सन्मान दिला होता. त्यानुसारच आपल्यालाही मराठी भाषेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आपण मराठी भाषेच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे वारसदार म्हणून आपण ही भाषा कशी टिकवली पाहिजे, तसेच जागतिक पातळीवर नेण्यासाठी काय प्रयत्न गरजेचे आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पावल टाकण्याचे काम आपल्या सगळ्यांचेच आहे, असेही ते म्हणाले.

आपले महाराष्ट्राचे राज्यकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच ग्रामपंचायतीच्या पातळीवरही मराठी भाषेला मानाच स्थान कसे मिळेल या अनुषंगाने प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी एक पाऊल आपणही सर्वांनी एकत्र मिळून टाकणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.