चढ-उतारामुळे अंडी व्यावसायिकांना फटका

दिलीप कोळी
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

सध्या पोल्ट्री व्यवसाय संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून हा व्यवसाय अडचणीत आहे. व्यवसायासाठी लाखो रुपयांची काढलेली कर्जे कशी परतफेड करायची, असा प्रश्न व्यावसायिकांपुढे आहे. या व्यवसायात तोटा होत असला, तरी इतर व्यवसायाप्रमाणे याचे उत्पादन बंद करता येत नाही. ‘नेक’ने अंड्यांचे दर वाढवायला पाहिजेत, अशी पोल्ट्री व्यावसायिकांची अपेक्षा आहे. 
- शत्रुघ्न जाधव, पोल्ट्री व्यवसायिक, विटा

विटा (जि. सांगली) - शरीराला पौष्टिक असलेल्या अंड्याच्या दरात सतत चढ-उतार होत असल्याने पोल्ट्री व्यावसायिक घायकुतीला आले आहेत. दररोज उत्पादन खर्चापेक्षा तीस पैसे तोटा त्यांना सहन करावा लागत आहे. राज्याच्या अंडी समन्वय समितीने (नेक) तोट्यात निघालेल्या या व्यवसायाला दराची उभारी द्यावी, अशी मागणी पोल्ट्री व्यावसायिकांतून होत आहे.

राज्यात दररोज अंड्यांचे दोन कोटी उत्पादन होते. नुसत्या मुंबईत दररोज एक कोटी दहा लाख, तर महाराष्ट्राबरोबर अन्य राज्यांतूनही येणाऱ्या अंड्यांची चार ते पाच कोटीची विक्री होते. सांगली जिल्ह्यातून कोकण, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, मिरज येथे विक्रीसाठी अंडी नेली जातात. मध्यंतरी कोंबड्यांना खाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा (धान्य) तुटवडा झाला होता. त्या वेळी मंत्रालयाच्या पशुसंवर्धन खात्याकडून सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यासाठी पोल्ट्रीधारकांकडून अर्ज भरून घेतले. परंतु, फक्त आश्‍वासन मिळाले; धान्य नाहीच.

सध्या अंड्याला साडेचार रुपये दर आहे. परंतु, कमिशन वजा जाता पोल्ट्री व्यावसायिकांच्या हातात चार रुपये मिळतात. हेच अंडे किरकोळ दुकानदार व्यावसायिकांकडून चार रुपयांना खरेदी करून पाच ते सहा रुपयांना विक्री करीत आहेत. त्यामुळे दरात तफावत निर्माण झाली आहे. व्यावसायिकांना पाच ते सव्वापाच रुपये मिळाल्यास आत्तापर्यंत झालेला तोटा भरून निघेल, असे व्यावसायिक सांगत आहेत. कोंबड्यांच्या खाद्यासाठी प्रामुख्याने मका लागतो. मक्‍याचा दरही मध्यंतरी २,६०० रुपये क्विंटल झाला होता. तो आता दोन हजार रुपये क्विंटल आहे, तरीही तो जास्त आहे. शासनाने कमी दरामध्ये खाद्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध करून द्यावा, अशी व्यावसायिकांची मागणी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: egg businessman loss by rate up down