उष्माघाताने राज्यात आठ जणांचा मृत्यू ? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - उन्हाळ्याच्या पहिल्या महिन्यात राज्यातील आठ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. उष्माघात झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयांमधील खाटा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यासाठी अत्यावश्‍यक औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयात ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

पुणे - उन्हाळ्याच्या पहिल्या महिन्यात राज्यातील आठ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. उष्माघात झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी ग्रामीण आणि जिल्हा रुग्णालयांमधील खाटा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यासाठी अत्यावश्‍यक औषधांचा पुरेसा साठा रुग्णालयात ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा चाळीश अंश सेल्सिअसच्या वर नोंदला जात आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार पुणे दौऱ्यावर आले असताना आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळ कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले. याबाबत "सकाळ'शी बोलताना डॉ. पवार म्हणाले, ""राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेऊन त्यावरच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्यातील जिल्हा रुग्णालयातील चार आणि ग्रामीण रुग्णालयातील दोन खाटा उष्माघाताच्या रुग्णांच्या उपचारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी अत्यावश्‍यक औषधांबरोबरच रुग्णालयातील पंखा किंवा वातानुकूलित यंत्रणा सज्ज ठेवावी. प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या रुग्णाला प्रथमोपचार करून तातडीने 108 या रुग्णवाहिकेतून जवळच्या मोठ्या सरकारी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.'' 

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ""राज्यात आतापर्यंत उष्माघाताने आठ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. या प्रत्येक मृत्यूची माहिती घेण्यात येत आहे. औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड, यवतमाळ आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून या उष्माघाताच्या संशयित मृत्यूची नोंद झाली आहे.'' 

आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडाळाचे उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण म्हणाले, ""उन्हात सातत्याने काम केल्याने किंवा फिरल्याने उष्माघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे आलेल्या रुग्णाच्या शरीराचे तापमान कमी करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. त्यासाठी पंखा, कूलर किंवा वातानुकूलित यंत्रणा याचा वापर करावा. रुग्णाचे शरीर गार पाण्याने पुसून घ्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. प्रत्येक तालुक्‍यातील एका सरकारी रुग्णालयात उष्माघातावर उपचार करता येतील, अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे.'' 

उष्माघात कसा होतो? 
रणरणत्या उन्हात सलग काही तास काम केल्याने उष्माघाताचा धोका वाढतो. वातावरणातील तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने शरीराचे तापमानही वाढते. त्यातून उष्माघात होण्याचा धोका असतो. 

सामान्य लक्षणे 
थकवा येणे, घशाला कोरड पडणे, धाप लागणे, उलट्या, भोवळ येणे. 

असा टाळा उष्माघात 
- उन्हात फिरणे टाळा 
- उन्हात शारीरिक कष्टाची कामे करू नका 
- वेळोवेळी भरपूर पाणी प्या 
- सैल, पांढरे, सुती कपडे घाला 
- गॉगल, टोपी, टॉवेल, उपकरणे वापरा 

उष्माघात झाल्यास काय करावे? 
- व्यक्तीस थंड ठिकाणी हलवा 
- काखेत व मानेवर बर्फाच्या पिशव्या ठेवा 
- गार पाण्याने शरीर पुसून घ्या 

काय करू नये 
- बेशुद्ध व्यक्तीस पाणी पाजू नका 
- स्नायू किंवा अंग चोळू नका 
- व्यक्तीला बर्फाच्या पाण्यात बुडवू नका. 

Web Title: Eight people died in the state heatstroke