बस-जीप अपघातात आठ जण ठार, दहा जण गंभीर जखमी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

वडनेर भैरव (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर खडकजांब, शिरवाडे वणी (ता. चांदवड) शिवारात आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार, तर दहा जण गंभीर जखमी झाले. महामार्गावर टायर फुटून क्रूझर जीपने दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने येत असलेल्या बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. 

किकवारी खुर्द (ता. बागलाण) येथील काही जण जीपमधून लग्नासाठी नाशिकला जात होते. जीप येथील प्रसिद्ध चिकूच्या बागेजवळून जात असताना अचानक तिचा टायर फुटला. त्यानंतर संबंधित जीपने दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूने नाशिकडून वडाळी भोईकडे येत असलेल्या सटाणा आगाराच्या बसला जोरदार धडक दिली. यात जीपमधील आठ जण जागीच ठार झाले. तर, अन्य दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. 

मृतांची नावे धनूबाई केदा काकुळते (वय 65, रा. किकवारी), रंता राजेंद्र गांगुर्डे (वय 45, डांगसौदाणे), तेजश्री साहेबराव शिंदे (रा. किकवारी), कृष्णाबाई बापू शिंदे, सरस्वतीबाई नथू जगताप, अशोक पोपट गांगुर्डे (रा. कळवण), शोभा संतोष पगारे, सिद्धी विनायक मोरे. 

गोटा टायरमुळे अपघात 
अपघातग्रस्त जीपच्या टायरची अत्यंत दयनीय अवस्था झालेली होती. केवळ टायर गोटा झाल्याने हा अपघात झाला. वेळेत टायर बदलले असते, तर आजचा दिवस बघायची वेळ आली नसती. अपघातात जीपचालकाचाही मृत्यू झाला आहे. वडनेर भैरव पोलिस ठाण्यात चालकासह जीपमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक पाटील यांनी सांगितले. 
 
Web Title: Eight people were killed and ten seriously injured in a bus-jeep crash