आठ क्विंटल कांदा विकून मिळाले उणे 138 रुपये 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सुपे - बाजार समितीत 17 गोण्या कांदा विक्रीसाठी पाठविला. लिलावानंतर आठ क्विंटल कांद्याचे पैसे तर मिळाले नाहीतच; उलट 138 रुपये 70 पैसे येणे दाखविण्यात आले. शहांजापूरचे (ता. पारनेर) शेतकरी अण्णा मोटे यांना हा आतबट्ट्याचा व्यवहार सोसावा लागला. 

पारनेर बाजार समितीत दर रविवारी व बुधवारी कांद्याचे लिलाव होतात. मोटे यांनी दोन दिवसांपूर्वी 17 गोण्या (798 क्विंटल) कांदा पाठविला. लिलावानंतर पैसे मिळतील, या आशेने ते व्यापाऱ्याकडे गेले. "तुमचा कांदा 100 रुपये क्विंटलने विकला' असे त्यांना सांगण्यात आले. कांद्याची पट्टी हातात पडल्यावर मोटे यांचा भ्रमनिरास झाला. त्यात कांद्याचे 798 रुपये जमेच्या बाजूला होते. वाहतुकीचे भाडे 850 रुपये, हमाली 51 रुपये, तोलाई 32 रुपये आणि इतर खर्च तीन रुपये 40 पैसे दाखविण्यात आला होता. एकूण खर्च होता 936 रुपये 70 पैसे. 

या साऱ्या व्यवहारात 138 रुपये 70 देणेच झाल्याचे समजल्यावर मोटे संतापले. "आता हे पैसे मी कसे देणार?', असे उद्विग्न होऊन ते म्हणाले. त्यांची मनोवस्था पाहून अडत व्यापाऱ्यानेही त्यांच्याकडून 138 रुपये 70 पैसे मागितले नाहीत. 

उत्पादनाचाखर्चही वसूल होत नसेल, तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे? सरकारने हमीभाव द्यावा; अन्यथा शेतकरी दिवसेंदिवस आणखी कर्जबाजारी होतील. परिणामी त्यांच्या आत्महत्या कधीच थांबणार नाहीत. 
- अण्णा मोटे, शेतकरी, शहांजापूर (ता. पारनेर) 

Web Title: Eight quintals of onion sold at minus 138 rupees