
Shivsena: राज्यात पुन्हा खळबळ! ठाकरे गटाचा पुन्हा एकदा सुपडासाफ होणार?
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेच्या शिंदे गटावर गंभीर आरोप केले. राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर टीका करत संजय राऊत यांना पैसे देऊन उद्धव ठाकरे यांनी फक्त बोलायला ठेवले आहे. असा पलटवार बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
तर येत्या काळात उद्धव ठाकरे गटातील आठ ते नऊ आमदार आणि दोन खासदार लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निकालावर टीका केली होती. यावर बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिलीय.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आमच्याकडे असल्यामुळे गाव पातळीवरचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे आमच्या शिवसेनेचेचं आहेत. आता त्यांना ठाकरे गटाकडे जायचं असेल तर इकडून तिकडे जावं लागेल, असेही जाधव यावेळी म्हणालेत. तर शिवसेना भवन आणि शिवसेनेच्या शाखा कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाही. जाधव यांनी शिवसेना भवनासह शिवसेनेच्या शाखांवर आपला दावा सांगितला आहे.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद ओळखण्यासाठी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कमी पडले. म्हणून त्यांच्यावर आज हे लाचारीचे दिवस आले असल्याची खोचक टीका जाधव यांनी केली आहे.