खडसे-गोटेंवर महाजनांची कुरघोडी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मुंबई - भारतीय जनता पक्षात (भाजप) मुख्यमंत्र्यांचे सर्वांत विश्‍वासू म्हणून ख्याती असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर पुन्हा एका शिक्‍कामोर्तब झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात महाजन हेच भाजपचा यशस्वी चेहरा असल्याचे आज धुळे महापालिकेच्या निकालानंतर स्पष्ट झाले. स्वपक्षातील जुन्या जाणत्या ज्येष्ठ नेत्यांवर यशस्वी रणनीतीने महाजन यांनी कुरघोडी करत नेतृत्वाची छाप पाडण्यात यश मिळवल्याचे मानले जात आहे.

यापूर्वी नाशिक व जळगावात महाजन यांनी भाजपला एकहाती सत्ता मिळवून दिली. महाजन यांनी महापालिका निवडणुकींमध्ये नेतृत्व करताना भाजपचे उत्तर महाराष्ट्रातले नेते एकनाथ खडसे यांच्यासह विद्यमान आमदार अनिल गोटे यांच्याशी थेट फारकत घेतली.

पक्षनेतृत्वाने देखील महाजन यांच्यावर विश्‍वास दाखवत निवडणुकीची सर्व सूत्रे त्यांच्याकडे सोपवली. नाशिकमध्ये दोनतृतीयांश बहुमतासह त्यांनी एकहाती सत्ता खेचून आणली, तर जळगावात सुरेश जैन यांच्यासारख्या मातब्बराच्या वर्चस्वाला आव्हान देत पहिल्यांदाच महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवला.

महाजन यांच्या वाढत्या राजकीय वर्चस्वाला निवडणुकीच्या मैदानातही यश मिळाल्याने त्यांचे पक्षातले महत्त्व वाढले आहे.

फडणवीस- महाजन जोडी यशस्वी
दरम्यान, भाजपच्या राजकारणात आता फडणवीस- महाजन या नेत्यांची जोडी निर्विवाद रणनीतीकार म्हणून ओळखली जाऊ लागल्याचे चित्र आहे. राज्यात कोणत्याही आंदोलनात सरकारच्या वतीने महाजन यांना शिष्टाईचा मान मुख्यमंत्री देत आहेत. शेतकरी आंदोलन, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलन, यामध्येही महाजन यांनाच मध्यस्थाची भूमिका बजावण्याची जबाबदारी देण्यात आली होती, त्यामुळे महाजन यांचे वाढते वर्चस्व व त्याला निवडणुकीच्या राजकारणात मिळत असलेला प्रतिसाद पाहता महाजन आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या टीममधील सर्वांत प्रभावी नेते झाल्याचे मानले जाते.

Web Title: Eknath Khadse Anil Gote Girish Mahajan Politics