
Eknath Shinde : त्यांचे राज्यभरात सर्कशीप्रमाणे शो होणार, पण शब्द...; शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
खेड : शिवसेना पक्ष आणि राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लवकरच लागणार आहे. मात्र राज्यात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. त्यातच शिंदेंना शिवसेना पक्ष चिन्हासहित मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे. यामुळे उद्धव ठाकरे मैदानात उतरले असून कोकणातील खेड येथे त्यांनी सभा घेतली होती. या सभेला आज एकनाथ शिंदेंची उत्तर सभा होत आहे. विशेष म्हणजे ज्या मैदानावर ठाकरेंनी सभा घेतली होती, त्याच मैदानावर ही सभा आयोजित कऱण्यात आली आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला डाग लावण्याचं काम केलं. मात्र आपण ते सोडवून आणलं. निवडणूक आयोगाने देखील आपल्या बाजुने निकाल दिला. बाळासाहेबांचे आशीर्वाद आपल्यासोबत आहे. मात्र यांनी सत्तेसाठी आपली भूमिका बदलल्याची टीकाही शिंदे यांनी केली.
आपण उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मी आलेलो नाही. खऱ्या अर्थाने आरोप किंवा टीकेला उत्तर देत असतात. परंतु, तोच-तोच थयथयाट तीच तीच आदळआपट, यावर काय बोलणार, मुंबईत सहा महिन्यापासून थयथयाट सुरू आहे, असं शिंदे म्हणाले.
मुंबईत काही बैठका झाल्या. महाराष्ट्रात देखील सर्कशीप्रमाणे राज्यभर शो होणार आहे. तेच टोमणे, तेच आरोप, तेच रडगाणं, हे सगळ तेच असतं. फक्त जागा बदलत जाते. त्यांच्याकडे दोनच शब्द आहेत. खोके आणि गद्दार. त्यांनी हिंदुत्व सोडलं. त्यांच्याविषयी मला काही सांगायची इच्छा नाही, असंही शिंदे म्हणाले.