
उद्धव ठाकरेंच्या भाषणावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, "रोजचा थयथयाट..."
ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी येथे जाहीर सभा घेतली. खेड येथील गोळीबार मैदानावर ही सभा होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला. तुम्ही धनुष्यबाण चोरला असेल पण तो चोरलात म्हणजे तुम्हाला पेलवेल असे नाही. जिथे रावण उताणा पडला तिथे मिंधे काय पेलणार?, असे उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या टिकेवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे. त्यांनी फक्त जागा बदलेली आहे. त्यांना आरोप-प्रत्यारोप केल्याशिवाय दिवस जात नाही. त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. त्यामुळे त्यांनी आरोप करावेत, आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ”
अनिल देशमुख आणी नवाब मलिक यांनी त्यांनी देशभक्ताची उपमा देऊ नये. हे करायला देखील ते मागेपुढे पाहणार नाहीत. आमच्या सरकारचा विकास पाहून त्यांना पोटदुखी झाली आहे. या इलाज आम्ही बाळासाहेब ठाकरे रूग्णालयात ठेवला आहे, असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, "आमचं काम पाहून विरोधकांच्या छातीत धडकी भरलेली आहे. कसब्यातील पोटनिवडणुकीचा एका विजयाने ते एवढे हुरळून गेले आहेत की त्यांना वाटतं की आता राज्य आणि देशामध्ये बदल घडेल. पण त्याचबरोबर तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला हे त्यांना दिसत नाही. यापूर्वीदेखील बदलाचे वारे वाहून गेले असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र २०१९ मध्ये देखील साडेतीनशे पेक्षा जास्तीच्या जागा मोदींच्या नेतृत्वात जिंकल्या. आताही येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये ४०० पेक्षा जास्त जागा महायुतीला विजय मिळेल आणि सर्व विरोधकांचा धुव्वा उडेल”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
"आजच्या सभेत राष्ट्रवादीने त्यांचे लोक पाठवले. उद्धव ठाकरे यांच्याकडे मुळ शिवसैनिक उरला नाही. राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची सेना गिळंकृत करेल आणि तेव्हा त्याचे डोळे उघडतील" असे एकनाथ शिंदे म्हणाले.