मंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेताना ज्यांचं नाव घेतलं, ते 'आनंद दिघे' आहेत तरी कोण?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

आनंद दिघेंनी कोणतीही निवडणूक लढवली नसली किंवा कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नसली तर ते 'ठाण्याचे बाळ ठाकरे' झाले होते, असं फ्रंटलाईन या मासिकात छापून आलं होतं.

मुंबई : महाविकास आघाडीचा शिवाजीपार्क मैदानावर काल शपथविधी झाला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ठाकरे यांच्याबराेबरच शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या प्रत्येकी दाेन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची शपथ लक्षवेधी ठरली. शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले, तसेच आपले गुरु आनंद दिघे यांचे त्यांनी आवर्जुन स्मरण केले.

मंत्री एकनाथ शिंदे शपथ घेताना म्हणाले, ''शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, धर्मवीर आनंद दिघे यांचं स्मरण करून, आई-वडिलांच्या पुण्याईने, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे, ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन...असे म्हणताच ठाण्यातून आलेल्या शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.

आनंद दिघे आहेत तरी?-
"आपण पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणतो. पण ठाणे त्याहून वेगळं आहे का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आमची माफी मागावी," हे वाक्य होतं विजयपत सिंघानिया यांचं. त्यांनी हे उद्गार का काढले असावेत? सिंघानिया हे ठाण्यातील सुनीतीदेवी सिंघानिया हॉस्पिटलचे मालक. 2001मध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एका शिवसैनिकावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शिवसैनिकाचा मृत्यू झाला आणि ही बातमी ठाण्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर या शिवसैनिकाच्या 1500 चाहत्यांनी सिंघानिया हॉस्पिटलला आग लावली.

कोण होता हा शिवसैनिक?
ज्या शिवसैनिकाच्या निधनानंतर हा उद्रेक झाला, त्यांचं नाव होतं आनंद चिंतामणी दिघे. दिघेंचा जन्म 27 जानेवारी 1952चा. ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात त्यांचं घर. या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. तरुण आनंद दिघे बाळासाहेबांच्या सभांना उपस्थित राहायचे.

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे
बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे दिघे आकर्षित झाले होते. बाळासाहेबांची त्यांच्यावर मोहिनी होती. त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं आणि 70च्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी लग्नसुद्धा केलं नाही," असं एक ज्येष्ठ पत्रकार सांगतात. शिवसेनेला ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यात आनंद दिघे यांच्या रूपानं फुलटाईम कार्यकर्ता मिळाला होता. दिघेंच्या कामाची धडाडी पाहून शिवसेनेनं त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुखाची जबाबदारी दिली. दिघेंच्या घरी आई, भाऊ आणि बहीण असा परिवार होता. परंतु जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आल्यावर त्यांनी घर वगैरे सगळं दूर केलं. जिथं कार्यालय होतं, तिथंच ते राहायचे, तिथंच झोपायचे. कार्यकर्ते त्यांना डबा आणून द्यायचे.

Image result for Anand Dighe HD IMAGES

जिल्हाप्रमुख ते 'धर्मवीर'
यादरम्यान दिघे यांनी टेंभी नाका परिसरात 'आनंद आश्रमा'ची स्थापना केली. दररोज सकाळी या आश्रमात 'जनता दरबार' भरायचा. परिसरातील लोक त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते त्या तत्काळ सोडवायचे.

आनंद आश्रमात समस्याग्रस्त लोक सकाळी 6 वाजल्यापासून जमलेले असायचे. दिघे लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे. बघतो, नंतर करतो, अशी त्यांच्या कामाची पद्धत नव्हती. तक्रार योग्य वाटल्यास ते संबंधितांना लगेच फोन लावायचे. प्रसंगी सांगूनही काम नाही होत म्हटल्यावर त्यांनी हातही उगारलेला आहे. यामुळे पोलीस आणि प्रशासन या सगळ्यांमध्ये त्यांचा धाक निर्माण झाला. देवा-धर्माच्या बाबतीत दिघे अतिशय कडक धोरण अवलंबवायचे. त्यांनीच टेंभी नाक्यावर सर्वप्रथम नवरात्र उत्सव सुरू केला. सर्वांत पहिली दहीहंडी सुरू केली. या सगळ्या धार्मिक कार्यातून त्यांची 'धर्मवीर' अशी ख्याती पसरली. शिवाय, ठाणे महापालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्यानंतर अनेक शिवसैनिकांना त्यांनी नोकऱ्या मिळवून दिल्या.

'ते दुसरे बाळ ठाकरेच होते'
"दिवसेंदिवस आनंद दिघेंचं प्रस्थ वाढत चाललं होतं. त्यांना वलय, प्रसिद्धी लाभत होती. त्यातून नाकापेक्षा मोती जड होतो की काय, अशी भावना मातोश्रीवर असल्याचं त्यावेळी ऐकण्यात येत होतं. कारण दिघेंमुळे शिवसेनेत एक स्वतंत्र संप्रदाय सुरू झाला होता. पण शिवसेनेत असं चालत नाही. हे राजा आणि बाकी प्रजा, असं धोरण आहे शिवसेनेत. यामुळे बाळासाहेब अस्वस्थ झाले होते, अशी त्यावेळी ठाण्यात चर्चा होती,"

Image result for Anand Dighe HD IMAGES

दिघेंच्या वाढत्या प्रसिद्धीबद्दल एक ज्येष्ठ पत्रकार म्हणतात. "आनंदच्या पक्षनिष्ठेविषयी प्रश्न नाही. आनंदच्या हिंदुत्वनिष्ठेविषयी शंका नाही, पण आनंद ज्या पद्धतीनं कारभार करत आहे त्याबद्दल प्रश्न आहे," असं त्यावेळी बाळासाहेबांनी म्हटलं होतं. तर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संमतीनुसारच काम करतो, असं दिघे यांनी म्हटलं होतं. "दिघेंनी कोणतीही निवडणूक लढवली नसली किंवा कोणत्याही पदाची अभिलाषा बाळगली नसली तर ते 'ठाण्याचे बाळ ठाकरे' झाले होते, असं फ्रंटलाईन या मासिकात छापून आलं होतं.

'तुझा खोपकर करू का?'
आनंद दिघे 1989 च्या ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीमुळे राज्यभर प्रकाशझोतात आले. या निवडणुकीत महापौरपदासाठी प्रकाश परांजपे शिवसेनेचे उमेदवार होते आणि शिवसेनेचा महापौर निवडून येणं अपेक्षित होतं. आनंद दिघे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख असल्यानं परांजपे यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण परांजपे यांचा फक्त एका मतानं पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेची काही मतं फुटल्याचं समोर आलं. या पराभवानंतर बाळासाहेब खवळले आणि त्यांनी 'गद्दार कोण?' असं विचारायला सुरुवात केली. बाळासाहेबांनी जाहीरपणे म्हटलं की, "ज्यांनी फंदफितुरी केली आहे, त्यांना आम्ही क्षमा करणार नाही," देसाई सांगतात. काही दिवसांनी शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांनी स्वत:च्याच पक्षाशी प्रतारणा करून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मत दिलं आणि त्यामुळे मग शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं, अशी चर्चा सुरू झाली. महिन्याभरानंतर खोपकरांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. याप्रकरणी दिघे यांच्यावर आरोप करण्यात आले आणि त्यांना टाडा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. त्यांच्या मृत्यूपर्यंत ही केस सुरू होती. "या प्रकारानंतर ठाण्यात काही वाद झाला तर 'तुझा खोपकर करू का?'असं म्हटलं जायचं," असं एक ज्येष्ठ  पत्रकार सांगतात.

आनंद दिघे

दिघे गेल्याने ठाणे झाले ठप्प...
24 ऑगस्ट 2001ची पहाट. गणोशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. अशातच त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि डोक्याला मार लागला. अपघातानंतर त्यांना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

दरम्यान, तिथं त्यांच्यावर सर्जरी करण्यात आली. 26 तारखेला दुपारी त्यांच्या पायाचं ऑपरेशन करण्यात आलं. पण संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली. संध्याकाळी 7.15 वाजता त्यांना पहिला हार्ट अटॅक आला. 7.25 मिनिटांनी त्यांना दुसरा मोठा हार्ट अटॅक आला. अखेर रात्री 10.30 वाजता हॉस्पिटलमध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी दिघे 50 वर्षांचे होते. आनंद दिघेंचा मृत्यू झाला हे सांगण्यास कुणीच धजावत नव्हतं. शेवटी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं की, "आनंद दिघे आपल्यातून गेले." आनंद दिघे दवाखान्यात सोबत मनोहर जोशी

उद्धव यांच्या घोषणेनंतर हॉस्पिलबाहेरील दिघेंच्या 1500 चाहत्यांनी संपूर्ण हॉस्पिटल जाळून खाक केलं. यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आणि नंतर 34 जणांना अटक करण्यात आली. दिघेंच्या मृत्यूनंतर ठाणे बंद ठेवण्यात आलं. असं असतानाही हजारो शिवसैनिक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले.दिघे यांच्या निधनानंतर ठाण्यात झालेल्या (2001) शोकसभेत बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, "आनंदच्या दाढीत हुकूमत होती. त्याच्या नादाला लागण्याची कोणाची हिम्मत नव्हती.''
   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eknath Shinde Pay Tribute To Balasaheb Thackarey And Remember Anand Dighe In His Minister Oth