ठाकरेंनी हाकललेले सहसंपर्कप्रमुख शिंदेसेनेत जिल्हाप्रमुख! सोलापुरची जबाबदारी सातजणांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकनाथ शिंदेसेना
ठाकरेंनी हाकललेले सहसंपर्कप्रमुख शिंदेसेनेत जिल्हाप्रमुख! सोलापुरची जबाबदारी सातजणांवर

ठाकरेंनी हाकललेले सहसंपर्कप्रमुख शिंदेसेनेत जिल्हाप्रमुख! सोलापुरची जबाबदारी सातजणांवर

सोलापूर : शिवसेनेशी बंडखोरी करून पक्षप्रमुखांशीच दोन हात केलेली शिंदेसेना आता उद्धव ठाकरे यांनाच शह देत आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांसाठी पाच जिल्हाप्रमुख आणि दोन लोकसभा मतदारसंघांसाठी दोन संपर्कप्रमुख नियुक्त केले आहेत. मूळ शिवसेनेचे जिल्ह्यात चार जिल्हाप्रमुख असून अनिल कोकीळ हे काही दिवसांपासून संपर्कप्रमुख आहेत.

महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपालिकांच्या काही दिवसांत निवडणुका होतील. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आता स्थानिक पातळीवर आघाडीची शक्यता धूसरच आहे. त्यामुळे भाजपसोबत हातमिळवणी करून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून आपली ताकद दाखवावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करायला सुरवात केली आहे. निवड करताना शिवसेनेतील नाराज पदाधिकारी, पण त्याची जिल्ह्यात राजकीय ताकद असावी, अशी अट असल्याचेही बोलले जात आहे. शिवसेनेत सोलापूरचे सहसंपर्कप्रमुख राहिलेले लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी आमदार तानाजी सावंत यांना महाविकास आघाडीमध्ये मंत्रिपद मिळावी अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. दोन वर्षे राजकारणापासून अलिप्त राहिलेले ठोंगे-पाटील आता पुन्हा राजकीय क्षेत्रात उतरले आहेत. त्यांच्यावर माढा व सांगोला या तालुक्यांची जबाबदारी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना जिल्हाप्रमुखपद दिले आहे. मूळ शिवसेनेचे जिल्ह्यात चार जिल्हाप्रमुख असून त्यात पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, धनंजय डिकोळे व संभाजी शिंदे यांचा समावेश आहे. दोन गटांमुळे आता शिवसैनिकच संभ्रमात आहेत.

शिंदेसेनेचे सात नवे पदाधिकारी

  • संपर्कप्रमुख :

  • संजय कोकाटे : (माढा लोकसभा)

  • नाना साठे : (सोलापूर लोकसभा)

जिल्हाप्रमुख :

  • लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील

  • अमोल शिंदे

  • चरण चवरे

  • मनीष काळजे

  • मंगेश चिवटे

आरोग्यमंत्री आज सोलापुरात

शिवसेनेने महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न दिल्याने नाराज झालेले तानाजी सावंत यांनी सोलापूरकडे पाठ फिरवली होती. पण, एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मंत्री झाल्यापासून ते तिसऱ्यांदा सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. उद्या (शनिवारी) शासकीय विश्रामगृहात दुपारी चार वाजता ते नूतन पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील, अशी माहिती जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिली.