"लांडगे, कोल्हे म्हणणाऱ्यांना वाघाच्या डरकाळीने उत्तर देऊ" ; एकनाथ शिंदे खेडमध्ये सभा घेणार! - Eknath Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Eknath Shinde : "लांडगे, कोल्हे म्हणणाऱ्यांना वाघाच्या डरकाळीने उत्तर देऊ" ; एकनाथ शिंदे घेणार खेडमध्ये सभा!

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सभेत शिंदे गटाचा चांगलाच समाचार घेतला. एकनाथ शिंदे, रामदास कदम यांच्यावर त्यांनी तुफान फटकेबाजी केली. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी आता एकनाथ  शिंदे यांची शिवसेना देखील मैदानात उतरणार आहे. 

एकनाथ शिंदे १३ मार्चला खेड येथे सभा घेणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. उदय सामंत म्हणाले, "शिवसेनेचे मुख्यनेते, वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १९ मार्चला खेड (रत्नागिरी) मध्ये. शिवसेनेची जाहीर सभा घेणार आहेत. लांडगे, कोल्हे म्हणणाऱ्यांना वाघाच्या डरकाळीने उत्तर दिल्या जाईल. कितीही आदळआपट करा योगेश कदमच आमदार होणार आहेत."

उद्धव ठाकरे यांच्या सभेची एकनाथ शिंदे यांनी दखल घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर आक्रमक टीका केली. या सभेला प्रतिसाद देखील प्रचंड होता. त्यामुळे हातची विधानसभेची जागा जाऊ नये एकनाथ शिंदे मैदानात उतरणार आहेत. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे -

"मी घरात राहुन जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्हीं घरोघरी, अगदी गुवाहाटीला फिरुन सांभाळु शकत नाही. दिल्लीत मुजरे मारायला जाण्यात तुमचं अर्ध आयुष्य जात आहे. ज्याना मंत्रीपद दिली नाहीत त्यांना सांभाळताना उरलेल जातंय. सगळे उद्योगधंदे गुजरातला जात होते. कारण गुजरात ला निवडणुका होत्या, आता परवा आयफोनचा कर्नाटकला जात आहेत. कारण तिकडे आता निवडणुका आहेत," अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली. 

उद्धव ठाकरे म्हणाले, "ज्यांनी बाळासाहेबांचे विचार कधी ऐकलेही नाहीत ते आम्हांला बाळासाहेबांचे विचार शिकवणार?. काय आहेत बाळासाहेबांचे विचार? नोकर्‍या जाऊ द्या हे विचार नव्हते, भूमीपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्‍या शिवसेनेचा विजय असो हा विचार घेऊन शिवसेनेची स्थापना झाली. कानडी मुख्यमंत्र्यानी डोळे दाखवले की शेपट्या घालुन बसणे हे बाळासाहेबांचे विचार? मी मुख्यमंत्री असताना त्यांची हिंमत नव्हती. दिल्लीसमोर शेपट्या आत घालुन बसणे हे बाळासाहेबांचे कदापि विचार नव्हते."