प्रचारात आता रंग भरणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

मुंबई - राज्यातील महापालिका निवडणूक प्रचारात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 26 जानेवारीपासून आघाडी घेतली असताना त्यांच्या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली आहे. दोन्ही पक्षांच्या कलगीतुऱ्यात मागे पडलेल्या कॉंग्रेसनेही राज्यभरात राळ उठविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई कॉंग्रेसमधील गटबाजीच्या पार्श्‍वभूमीवर "बॅकफूट'वर गेलेल्या कॉंग्रेस नेत्यांनी युतीतील दुफळीचा फायदा उठविण्याचा निर्णय घेतला असून, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि गुरूदास कामत मुंबईतील प्रचारात उतरणार आहेत. 

शिवसेना- भाजप कलगीतुरा 
उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत आजपर्यंत चार सभा झाल्या आहेत. आणखी काही दिवस ते दररोज दोन सभा मुंबईत घेणार आहेत. या सभांमध्ये ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका करण्यास सुरवात करून निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेचा नंबर एकचा शत्रू भाजप असल्याचे दाखवून दिले आहे. त्यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष ऍड. आशिष शेलार, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदी भाजप नेते प्रत्युत्तर देतील. 

कॉंग्रेस नेते सरसावले 
शिवसेना आणि भाजपच्या आरोप-प्रत्यारोपात मागे पडलेले कॉंग्रेस नेते आता सरसावले आहेत. मुंबई कॉंग्रेसमधील दुफळीमुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते गुरूदास कामत मुंबईच्या प्रचारात उतरणार असल्याचे कॉंग्रेसमधून सांगण्यात आले. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांची जाबाबदारी सोपविण्यात आली असली तरी राणे यांचा करिष्मा पाहता मुंबईत त्यांच्या एक-दोन सभा आयोजित करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पुणे व पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण राज्यभरात प्रचार दौरे करणार असून, ते मुंबईतील सभांमध्येही सहभागी होणार आहेत. 

पवारांच्या सभेसाठी प्रयत्न 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या शनिवारीच मुंबईत सभा घेतली. पवार यांची आणखी एखादी सभा आयोजित करण्याचा प्रयत्न सचिन अहिर यांचा आहे. मुंबईची जबाबदारी प्रामुख्याने अहिर यांच्यावर असून, त्यांच्या मदतीला नवाब मलिक, सुनील तटकरे असतील. 

अमित ठाकरे मैदानात 
दरम्यान, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे प्रचाराच्या मैदानात उतरले असून, त्यांनी "फेसबुक लाइव्ह'द्वारे मतदारांशी संवाद सुरू केला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा कार्यक्रम निश्‍चित करण्याची लगबग "कृष्णकुंज'वर सुरू असून, मुंबईसह ठाणे, नाशिक, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे राज यांच्या सभा होणार असल्याचे पक्षातून सांगण्यात आले.

Web Title: election campaign