दानवे आता नोटीस स्वीकारा... 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

मतदानाच्या काही तासांआधीच "मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा' असे खळबळ उडवून देणारे विधान करत विरोधकांच्या हाती ऐते कोलीतच दिले. अखेर त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. या वादग्रस्त आणि मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्या विधानाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत रावसाहेब दानवे यांना शनिवारी रात्री उशीरा नोटीस बजावली.

औरंगाबाद - वादग्रस्त विधानांसाठी प्रसिध्द असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पैठणमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान मतदानाच्या काही तासांआधीच "मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा' असे खळबळ उडवून देणारे विधान करत विरोधकांच्या हाती ऐते कोलीतच दिले. अखेर त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. या वादग्रस्त आणि मतदारांना प्रलोभन दाखवणाऱ्या विधानाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत रावसाहेब दानवे यांना शनिवारी रात्री उशीरा नोटीस बजावली. लक्ष्मी स्वीकारा म्हणणाऱ्या दानवे यांच्यावरच आता निवडणूक आयोगाची "नोटीस स्वीकारा ' असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

राज्यातील नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेल्या भाजपच्या नेत्यांचा तोल सुटत आहे. तिसऱ्या टप्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण नगरपालिका निवडणुक प्रचारा दरम्यान याचा अनुभव आला. निवडणूक मतदानाच्या पूर्वसंध्येला पैठण येथिल शिवाजीचौकात भाजपाच्या प्रचारसभेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या खास ग्रामीण शैलीत मतदानाच्या आदल्या दिवशीच महत्व पटवून देतांना खळबळजनक विधान केले. " आज सतरा तारीख आहे, आणि उद्या अठराला मतदान आहे. आपल्याला सगळ्यांना घरी जायची गडबड झालेली आहे. त्याचे कारण आहे की, निवडणुकीमध्ये निवडणूकीची पहिली रात्र ती अत्यंत महत्वाची असते. कदाचित अचानकपणाने लक्ष्मीदर्शन सुध्दा निवडणुकीच्या एकदिवस आगोदर होत असते.

त्यामुळे अशी लक्ष्मी जर घरी आली, तर तिला परत करु नका. तिचे स्वागत करा पण, मतदानाचा जो निर्धार पक्‍का केला आहे. तो निर्धार पक्का ठेवा, कमळ निशाणीचे बटन दाबा आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी करा' हे ते वक्तव्य. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्याचा कडकडाट केला असला तरी हे विधानच भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. 

निवडणुक आयोगाचा बडगा 
रावसाहेब दानवे यांच्या लक्ष्मी स्वीकारा या विधाना विरुध्द राष्ट्रवादीसह कॉंग्रेस व इतर पक्षांनी जिल्हाधिकारी व निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंवदत दानवे यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानूसार पैठण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भरारी पथकाच्या अहवाल व भाषणाच्या सीडीवरुन रावसाहेब दानवे यांना आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा करणारी नोटीस शनिवार (ता.17) रात्री उशीरा बजावली आहे

Web Title: election commission gave notice to raosaheb danve for controversial remark