राज्यभरात "ढाबे दणाणले'...!

संजय मिस्कीन- सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

95 कोटी रुपयांची बोकडविक्री शक्‍य
मद्याची मागणी 20 टक्‍क्‍यांनी वाढली.
जेवणावळी व पार्ट्यांचे रंगले फड.
ग्रामीण भागात सुमारे 1500 कोटींची उलाढाल.

मुंबई - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा आखाडा रंगात येत असताना राज्यभरात जेवणावळी व पार्ट्यांचे फड गावोगावी रंगू लागले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार तब्बल 95 हजारांहून अधिक बोकडांचा या निवडणुकांत बळी जाण्याची शक्‍यता असून, गावोगावी कार्यकर्ते व समर्थकांच्या गर्दीने ढाबे दणाणायला सुरवात झाली आहे.

त्यातच कार्यकर्ते व समर्थकांचा रोजचा "श्रमपरिहार' व्हावा, यासाठी मद्याचा महापूर गावागावात सुरू होण्याची भीती असून, यासाठी शेजारील राज्यातून मद्याची "घुसखोरी' होण्याचे संकेत आहेत; तर दैनंदिन मद्याच्या विक्रीत तूर्तास तरी 20 टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात 27 जिल्हा परिषदांतील 1639 गट व पंचायत समितीचे 3248 गण निवडणुकीच्या प्रचाराने बहरत आहेत. तब्बल 20 हजारांहून अधिक गावे व वाड्या मतदानात थेट सहभागी होत असल्याने राज्यात "मिनी विधानसभेची' झलक सुरू आहे.

त्यातच चारही मोठे पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत असल्याने इतर छोट्या पक्षांनीदेखील सवतासुभा मांडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे राज्यभरात जिल्हा परिषदांसाठी 13 हजारांहून अधिक, तर पंचायत समितीसाठी 26 हजारांहून अधिक असे एकूण 40 हजारांच्या आसपास उमेदवार रिंगणात उभे राहतील, असा अंदाज आहे. निवडणूक आयोगाच्या खर्चाच्या मर्यादेत या उमेदवारांचा एकूण खर्च गृहित धरला तरी तो 400 कोटींच्या दरम्यान जाणार असून, निवडणूक तज्ज्ञांच्या मते सुमारे 1500 कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल या निवडणुकांत होईल. यामध्ये निवडणुकीचे प्रचार साहित्य, प्रचाराची वाहने, इंधन, कार्यकर्त्यांची रोजची "सोय', सभा, प्रचारफेरी या खर्चाचाही समावेश आहे.

आचारसंहितेची कितीही कडक अंमलबाजवणी होत असली तरी, बहुतांश उमेदवार रोजचा खर्च सादर करताना एसटी बसची तिकीटं, स्वत:च्या वाहनातल्या इंधनाचा खर्च असा "हातचा राखून' पाचशे ते हजार रुपयांचा खर्च सादर करत असल्याचे समोर येत आहे. "नोटाबंदी'च्या मंदीचे फारसे सावट निवडणुकांवर नसल्याचे स्पष्ट चित्र आहे.
प्रत्येक गावांत छाननीनंतर अधिकृत उमेदवारांनी प्रचाराची सुरवात जेवणावळीने सुरू केली आहे. ढाब्या-ढाब्यावर सध्या विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचे गट आपला नेता विजयी झाला पाहिजे, यासाठी चटकदार जेवणासोबत रणनीती आखली जात आहे. आज या गावात तर उद्या त्या गावांत "तर्रीबाज', "रस्सा' पार्ट्या रंगू लागल्या आहेत.
उद्या (ता.7) ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, त्यानंतर मात्र प्रचाराची खरी रणधुमाळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत सुरू होणार आहे.

अशा निवडणुका
पंचायत समिती गण - 3248
जिल्हा परिषद गट - 1639
एकूण गावे/वाड्या 19500

Web Title: election party