सात जिल्हा बॅंका व तीन कारखान्यांची लागली निवडणूक ! 4 जानेवारीपासून निवडणूक प्रक्रिया 

तात्या लांडगे
Wednesday, 30 December 2020

ठळक बाबी... 

  • राज्यातील सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या निवडणूका घेण्यास परवानगी 
  • सात जिल्हा बॅंका, तीन कारखान्यांसह 38 सहकारी संस्थांची पहिल्या टप्प्यात निवडणूक 
  • निवडणूक ज्या टप्प्यावर स्थगीत केली, तिथून पुढील टप्प्यापासून निवडणूक प्रक्रियेस होणार प्रारंभ 
  • 4 जानेवारीपासून निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश 
  • बीड, नगर, परभणी, गडचिरोली, औरंगाबाद, अकोला व नांदेड जिल्हा बॅंकांची पहिल्या टप्प्यात निवडणूक 

सोलापूर : कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीस 31 डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली होती. मात्र, आता 'पुन:श्‍च प्रारंभ'च्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने अनलॉक केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर मुदत संपलेल्या मात्र, कोरोनामुळे निवडणूक घेता न आलेल्या सात जिल्हा बॅंकांसह तीन सहकारी साखर कारखाने आणि 25 विकास सोसायट्या, एक पगारदार संस्था व दोन पतसंस्थांची निवडणूक प्रक्रिया 4 जानेवारीपासून सुरु करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी काढले आहेत.

 

ठळक बाबी... 

  • राज्यातील सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या निवडणूका घेण्यास परवानगी 
  • सात जिल्हा बॅंका, तीन कारखान्यांसह 38 सहकारी संस्थांची पहिल्या टप्प्यात निवडणूक 
  • निवडणूक ज्या टप्प्यावर स्थगीत केली, तिथून पुढील टप्प्यापासून निवडणूक प्रक्रियेस होणार प्रारंभ 
  • 4 जानेवारीपासून निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश 
  • बीड, नगर, परभणी, गडचिरोली, औरंगाबाद, अकोला व नांदेड जिल्हा बॅंकांची पहिल्या टप्प्यात निवडणूक 

 

बीड, नगर, परभणी, गडचिरोली, अकोला, नांदेड व औरंगाबाद या सात जिल्हा बॅंकांसह मुळा सहकारी साखर कारखाना, नेवासा, लोकनेते घुले- पाटील सहकारी साखर कारखाना, नेवासा आणि वृध्देश्‍वर सहकारी साखर कारखाना, पाथर्डी या कारखान्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात बीड जिल्हा बॅंकेने सर्व तयारी यापूर्वीच केली असून आता निवडणुकीचा कार्यक्रम मान्यतेसाठी पाठविण्याचे आदेश सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. तर नांदेड जिल्हा बॅंकेच्या मतदारांची प्रारुप यादी प्रसिध्द केली जाणार असून उर्वरित पाच जिल्हा बॅंकांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. मुळा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज केले असून उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया आता सुरु होईल. लोकनेते घुले- पाटील साखर कारखान्याची प्रक्रिया उमेदवारी अर्जाच्या छाननीपासून सुरु होऊन वृध्देश्‍वर साखर कारखान्याने निवडणूक कार्यक्रमास मान्यता घेणे बाकी आहे. दुसरीकडे बाबुर्डी घुमट विकास, बाबुर्डी बेंड विकास, वाळुंज विकास, दशमी गव्हाण विकास, सारोळा कासार विकास, मल्हार निंबोडी (सर्व अहमदनगर), खिर्डी विकास, माळ वडगाव विकास, माळवडगाव (श्रीरामपूर), माता साळवणदेवी विकास, घोटी विकास, मुंगूसगाव विकास, जनाई (श्रीगोंदा), सिध्देश्‍वरवाडी विकास (पारनेर), निंबे नांदूर विकास (शेवगाव), वाशिम, भोकर (बुर्द्रूक व खुर्द), बटाळा, लोहगाव, दुगाव (जि. नांदेड) आणि सवादा सहकारी पतसंस्था (जळगाव) व धुळे- नंदूरबार जिल्हा पगारदार सहकारी बॅंकेचा समावेश आहे. या सर्व सहकारी संस्थांनी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. तर सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया तिथू थांबली, तिथून पुढे निवडणूक कार्यक्रम सुरु केला जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Election of seven district banks and three factories begins! Election process from 4 January