गुंडांना निवडणार की पाडणार? 

election
election

विकासाच्या वाटचालीत स्थानिक स्वराज्य संस्थांचं महत्त्व निर्विवाद आहे. आज महाराष्ट्रातल्या 10 महापालिका आणि 16 जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. पुढील पाच वर्षांत आपल्या रोजच्या नागरी सुविधांचं व्यवस्थापन, नियोजन कोण करणार याचा फैसला यात करायचा आहे. नगरपिते-नगरसेवक काहीही म्हणा, यांपैकी कोणत्याही नावानं जनतेच्या सेवेसाठी म्हणून लोकप्रतिनिधी बनलेले सेवेच्या नावाखाली जे काही करतात, त्यावर पुढची पाच वर्षे टीका करत बसण्यापेक्षा आज सजगपणे मतदानाचं कर्तव्य बजावायला हवं. "इलेक्‍टिव्ह मेरिट' किंवा निवडून येण्याची क्षमता नावाच्या तद्दन भंपक निकषाखाली राजकीय पक्षांनी अनेक गुंडपुंड निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यांची मस्ती उतरवण्याची आणि या गणंगांच्या जिवावर राज्य करण्याचे मनसुबे जमीनदोस्त करण्याची हीच संधी आहे. लोकशाहीनं आजवर देशात चमत्कार वाटावा असा निकाल अनेकदा दिला आहे. सत्ता-संपत्तीच्या बळावर मतदाराला गृहीत धरणाऱ्यांची दाणादाण उडविण्याची क्षमता तुमच्या एका मतात आहे. ते विकू नका आणि दबावाखाली देऊही नका किंवा मत द्यायचं टाळून या घातक प्रवृत्तींना आपल्याच डोक्‍यावर मिरे वाटायची संधीही देऊ नका. उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांनी मतदान करण्याविषयीची उदासीनता या गुंड प्रवृत्तीला आपली पोळी भाजून घेण्याची आयती संधी देते. असले मौन ही गुंडांना मूकसंमती ठरू नये. या निवडणुकीत काहीही झालं, तरी आपल्या भागातून कोणी गुंड निवडून जाणार नाही, एवढा विचार पक्का ठेवा; बाकी मत कोणत्याही पक्षाला द्या किंवा अपक्षाला द्या, मर्जी है आप की! 

राजकारणाचं गुन्हेगारीकरण नावाचं प्रकरण काही दशकं चर्चेत आहे. ते देशात आहे, राज्यात आहे आणि आपल्या गावात किंवा शहरातही. राजकारणावर वर्चस्व ठेवायचं, तर गुंडांची फौज साथीला ठेवावी लागते, असा एक समजच पसरला आहे. या गुंडांनी राजकारण्यांसाठी दबाब-दहशतीचे प्रयोग करावेत, त्या बदल्यात राजकीय व्यवस्थेनं गुंडांच्या कारवायांना संरक्षण द्यावं, ही या किडीची सुरवात होती. आता रोग चांगलाच फैलावला आहे. लोकशाहीसाठी आवश्‍यक असणाऱ्या सशक्त, तसेच भय आणि दबावापासून मुक्त राजकीय व्यवस्थेसाठी तो जणू कॅन्सरच बनला आहे. आपल्या बळावर नेता, पक्ष राजकारण करतो, तर आपणच राजकारणात यावं असं गुंडांना वाटू लागणं हे आजार बळावल्याचं लक्षण आहे. गुंडांचं राजकीय पुनर्वसन करण्यात कोणालाच काही वाटेनासं होणं, हे विचार आणि विकासाच्या कल्पना, कार्यक्रमावर आधारित राजकीय स्पर्धेच्या तत्त्वाला हरताळ फासणारं आहे. गुंडांचा राजकारणातला वावर आणि वापर इतका वाढला आहे, की अशा आरोपांची कोणा पक्षाला लाजही वाटेनाशी झाली आहे. आपल्या पक्षातल्या गुंडाच्या उमेदवारीवर बोलण्यापेक्षा इतरांकडं कसे गुंड आहेत, असं समर्थन केलं जातं. कोण अधिक गुंडांना पंखाखाली घेतो याचीच जणू स्पर्धा चालली आहे. पैसा आणि गुंडगिरीतून सत्ता आणि सत्तेतून गुणाकारानं वाढणारा पैसा, त्याच्या संरक्षणासाठी पुन्हा गुंडगिरी असं विषचक्र सार्वत्रिक झाल्याचं आताची निवडणूक दाखवते आहे. यात कोणाला नावं ठेवावीत आणि कोणाची बाजू घ्यावी? पक्ष म्हणजे जणू गुंडांना आणि भ्रष्टांना शुभ्रसफेद करणार असल्याच्या आविर्भावात गुंडांच्या शिरकावाचं, त्यांना उमेदवारी देण्याचं समर्थन करताना या निवडणुकीनं दाखवलं. खंडणी, हप्तेवसुली, जमिनी लाटणं यांपासून फसवणूक, खून-मारामाऱ्यांपर्यंत गुन्ह्यांची रास रचणारे उमेदवारीसाठी पात्र ठरतात आणि पक्षासाठी, नेत्यांसाठी सतरंज्या उचलणारे तिथंच राहतात; आणि याला निवडून येण्याची क्षमता नावाचं गोंडस कोंदण बहाल केलं जातं! हे आणखी धक्कादायक; तेवढंच निर्लज्जपणाचंही आहे. राजकीय पक्षनेते यांना या व्याधीनं आणि निवडक विस्मरणानं ग्रासलं असलं, तरी मतदारांनी डोकं शाबूतच ठेवायला हवं. 

आज आपण आपल्या प्रभागाचे प्रतिनिधी निवडणार आहोत आणि ते उद्या आपल्या शहराच्या, जिल्ह्याच्या विकासाचं नियोजन करणार आहेत. रस्ते, पाणी, सांडपाणी, कचरानिर्गत यांसारख्या वर्षानुवर्षे तुंबलेल्या समस्यांवर त्यांना उत्तरं शोधायची आहेत, प्रत्यक्षात आणायची आहेत. त्यापलीकडं नव्या जमान्यातली, आधुनिक शैलीच्या जगण्याला पूरक, नव्या पिढीच्या आकांक्षांना वाव देणारी गावं-शहरं बनवायची आहेत. यासाठी अभ्यास, कष्टाची तयारी आणि लोकांविषयी आत्मीयता लागते. मतं विकत घेणाऱ्यांत हे गुण शोधत असाल, तर काही रुपड्यांसाठी आपण आपली पाच वर्षं उधळून टाकतो आहोत याचं भान मतदान केंद्रात जाताना अवश्‍य ठेवा. पैशाची अनाठायी उधळण, ओंगळवाणं कथित शक्तिप्रदर्शन आणि त्याचा भपका याला भुलायचं कारणच नाही. पक्ष कोणताही असो, सामान्यांना नाडणाऱ्यांना आपल्या भवितव्याचे निर्णय घेणाऱ्या सभागृहात थारा मिळता कामा नये. निवडणूक खर्चावरील मर्यादेला डावलून पैसे वाटण्याचं धुमशान अलीकडं प्रत्येक निवडणुकीत रंगतं आहे. हा बाजार या निवडणुकीतही आहेच. हजार-पाचशेपासून दहा, पंधरा हजारांपर्यंत मतांचा दर लावणारे उद्या आपल्या वतीनं शहराच्या, गावाच्या हिताचा सौदा करायला मागंपुढं पाहणार नाहीत. थेट पैसा देणं-घेणं असेल किंवा सोसायटी रंगवून देतो, टाक्‍या साफ करून देतो इथपासूनची सामूहिक कामं करून देणं असो, हा सारा निवडणुकीतला भ्रष्टाचारच आहे आणि तो पोसणारे कोणत्या पक्षाचे आहेत की अपक्ष, याला अर्थ उरत नाही. ते लोकशाहीचे मारेकरी आहेत. हे करणारे बहुतांश गुंडगिरीचा आसरा घेणारेच असतात. सार्वजनिक जमिनींची वासलात लावणं, आरक्षणांचा बाजार मांडणं, ठेकेदारीत मलई शोधणं, विकासापेक्षा कंत्राटांत रस घेणं, हे सारं सुरू होण्याचं मूळ निवडणुकीतल्या भ्रष्ट व्यवहारात आहे; आणि तो रोखण्याचं सामर्थ्य आणि जबाबदारीही मतदारराजाची आहे. आज आश्‍वासनांची खैरात करणारे किंवा व्यक्तिगत काम करूनही देणारे भूल पाडतील, पण त्याने जे मूलभूत बदल गरजेचे आहेत, ते कधीच होणार नाहीत. पुढच्या पिढ्यांच्या हिताचा बळी देऊन आज व्यक्तिगत कामं करणाऱ्यांवर खूष होण्यात काय अर्थ आहे? उमेदवारांची संपत्ती कशी बदलत गेली, याचाही अवश्‍य विचार करा. पैसा मिळवणं वाईट नाही; मात्र तो कोणत्या मार्गानं हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कसल्याही लक्षणीय उद्योग-व्यवसायाशिवाय कित्येक पटींनी संपत्ती वाढते, अनेक महागड्या गाड्या उडवणं आणि हातात-गळ्यात सोन्याचे साखळदंड मिरवणं यासारखं श्रीमंतीचं ओंगळ प्रदर्शन सुरू होतं. निवडणुकीत उतरलेल्या सगळ्या गुंडांकडं सारी साधनसंपत्ती आली कुठून, याचा विचार मतदानापूर्वी अवश्‍य केला पाहिजे. 

गुन्हेगारीचा इतिहास असणारे अनेक जण या निवडणुकीच्या तोंडावर पावन होऊ पाहत आहेत. एखाद्या पक्षात डाळ शिजत नाही म्हटल्यावर रात्रीत पक्ष बदलणारे काही महाभागही यांत आहेत. कुळं काढणं, खंडणीवसुली, जमिनींचा बेकायदा ताबा घेणं, ठेकेदारांना पैशासाठी नाडणं, उद्योग-व्यावसायिकांना छळणं असले सारे धंदे करून पुन्हा ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून मिरवायची हौस आहे, त्यांना दणका देण्याची हीच वेळ आहे. ज्यांची खरी जागा गजाआडच असू शकते, ते राजसोरपणे आपलं प्रतिनिधित्व करायला आणि मतं मागायला येतात, हे कमावलेलं निर्ढावलेपण आहे. ते आपणच केलेल्या दुर्लक्षातून आलेलं आहे. निवडणुकीच्या रिंगणातल्या सगळ्यांच्या कृष्णकृत्यांच्या कुंडल्या जगजाहीर आहेत. निवडणूक आयोगानं त्या खुलेपणानं मांडल्याही आहेत. खरं तर ज्याची पाटी कोरी असा स्वच्छ पर्याय असेल, तर लोक साथ देतात असाही अनुभव आहे. दिल्लीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना कंटाळलेल्या मतदारांनी हे दाखवलं होतं. तरीही आपल्या जागा वाढवणं आणि महापालिका, जिल्हा परिषदा काबीज करणं यासाठी भ्रष्ट आणि गुंड साथीला घ्यावेत, असं राजकीय पक्षांना का वाटतं, हे कोडंच आहे. भ्रष्टाचारमुक्ती, पारदर्शक कारभार या सगळ्या व्यासपीठांवरून ठोकायच्या बाता असू नयेत. असली सुभाषितं सांगायची आणि वारेमाप गुंड निवडणुकीत उतरवायचे, जातीची गणितं मांडत उमेदवारी ठरवायची हे सारं सत्तेच्या मोहापायी विवेक गमावल्याचं लक्षण आहे. यात उडदामाजी काळे गोरे काय निवडावे, असाच सगळ्या राजकीय पक्षांचा व्यवहार आहे. यासाठी एखादा राजकीय पक्ष, त्यांचा नेता याविषयी आकर्षण, सहानुभूती असली, तरी पक्ष गुंडांवर कृपाछत्र धरणार असेल, तर असले उमेदवार नाकारायला हवेत. 

पैशाच्या जोरावर, गुंडगिरीच्या बळावर आणि जातीच्या मतगठ्ठ्यांवर राजकीय कारकीर्द करू पाहणारे आणि त्यांना पावन करणारे पक्ष हे गणंग निवडून यावेत यासाठी सारे काही करणारच. त्यांच्यासाठीचे बांधील मतदान घडवून आणले जाणार. या वेळी स्वस्थ बसून राहणं हा पर्याय उरत नाही. याविरोधात मत नोंदवणं हाच मार्ग उरतो. या वेळची निवडणूक चुरशीची आहे आणि कित्येक ठिकाणी अत्यंत कमी फरकानं निकाल लागेल. तेव्हा तुमचं एक एक मतही गुंड आणि भ्रष्टांचं स्वप्न उद्‌ध्वस्त करू शकते. अशा प्रवृत्तींना मत देणं किंवा मत द्यायचंच टाळणं म्हणजे आपल्या उद्याचा बळी देणं किंवा बळी जात असताना निवांत राहणं. यातलं काहीच परवडणारं नाही. मत कोणाला द्यायचं हा सर्वस्वी मतदारराजाचा अधिकार आहे. "सकाळ'नं नेहमीच खुल्या वातावरणात स्वतंत्रपणे मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या युवकांवर, नागरी सुविधांच्या अभावाचा सर्वाधिक त्रास सहन करणाऱ्या महिलांवर आपला उद्या कसा असावा हे ठरवण्याची अधिक जबाबदारी आहे. मतदानाच्या आधी लाखो-करोडोंचा चुराडा होईल, थैल्या खुल्या होतील, आश्‍वासनांचा पाऊस पडेल, दबाव-दहशतीचे प्रयोग होतील. पैसा, जात एवढंच नव्हे, तर अगदी पक्षाचाही मोह न ठेवता निर्भयपणे मतदान करा. आज या टोळक्‍यांना मतांचा बाजार मांडू देणं म्हणजे उद्या आपल्या शहराच्या-गावाच्या हिताचा लिलाव मांडायला मूक संमती देण्यासारखं आहे. हे लोकशाहीशी विसंगत आहेच, पण देशविरोधीही आहे. तेव्हा मत देताना एक निर्धार करूयात, गुंड, भ्रष्ट तितका आपटूया! 

धडा शिकविणार, आम्ही धडा शिकविणार... 
-- सुनील धुळेकर 

धडा शिकविणार, आम्ही धडा शिकविणार... स्वतः पुष्ट अन्‌ भ्रष्ट, पण आम्हा मतदारांनाही भ्रष्ट करणाऱ्यांना आम्ही धडा शिकविणार... 
ताटल्या-डबे अन्‌ साड्या वाटणाऱ्यांना धडा शिकविणार... 
ज्यूसमेकर अन्‌ सोन्याची नाणी वाटणाऱ्यांना धडा शिकविणार... 
आमचा महिन्याचा किराणा फुक्कट भरून देणाऱ्यांना धडा शिकविणार... धडा शिकविणार, आम्ही धडा शिकविणार... 
चहाचे कप... नाणी अन्‌ पैठणी... कॅलेंडर अन्‌ इलेक्‍ट्रॉनिक वस्तू... रेलचेल-रेलचेल... आम्हाला भिकारी समजणाऱ्यांना आम्ही धडा शिकविणार... 
तुमच्याकडं मताला भाव काय फुटला साहेब? आमच्याकडं पाच हजार... तुमच्याकडं सात हजार? अरे वा... अरे वा... आम्हाला विकत घेणाऱ्यांना आम्ही धडा शिकविणार... 
हॉटेलात जेवण अन्‌ चापायला बिर्याणी... कार्यकर्त्यांची फौज अन्‌ सगळ्यांचीच मौज... पैसा उधळणाऱ्यांना आम्ही धडा शिकविणार... 
हे आता थैली उघडणार अन्‌ आम्हाला वाटणार... दोन-तीन कोटी खर्च करणार... अन्‌ निवडून आल्यावर पहिल्या दिवसापासून मीटर डाऊन अन्‌ वसुली सुरू... आमच्याच पैशांची वसुली करणाऱ्यांना धडा शिकविणार... आम्ही धडा शिकविणार... 
नाही दिलं तर पाणी तोडणार... घरावर दांडगे पाठविणार... आमच्याच गल्लीत आम्हालाच चोरी... शिरजोरी करणाऱ्यांना धडा शिकविणार... 
प्रत्येक कामात टक्के काढणार... कामं न करताच कामाची बिलं काढणार ... आपल्याच दत्तूंना कामं वाटणार... सुमारं कामं अन्‌ बेसुमार नोटा... गळक्‍या इमारती अन्‌ खड्ड्यात रस्ते... टक्केवारी करणाऱ्यांना धडा शिकवणार... धडा शिकवणार आम्ही धडा शिकवणार... 
भुरट्या चोरांना धडा शिकवणार... चंदनचोरांना धडा शिकवणार... धडा शिकवणार आम्ही धडा शिकवणार... 
स्टॅंडिंगमध्ये जाणाऱ्यांना अन्‌ तिथं एकच पक्ष "पैसा पक्ष' समजणाऱ्यांना धडा शिकविणार... 
हे म्हणणार "रोजचा हप्ता दिला तरच रस्त्यावर स्टॉल लावा...', प्रत्येक विक्रेत्याला लुटा-नडा... लुटणाऱ्या-नडणाऱ्यांना धडा शिकविणार... 
कामगार भरती... कसलीही खरेदी... कोणत्याही व्यवहारांत यांचीच चांदी... चांदी करणाऱ्यांना धडा शिकविणार... धडा शिकविणार आम्ही धडा शिकविणार... 
प्रत्येक नव्या बिल्डिंगमध्ये यांना फ्लॅट हवा... भाऊंचे तीन तर ताईंचे गावात चार-चार फ्लॅट... बिल्डरलाही नाडले... फायलीत अडवले... "द्या फ्लॅट नाही तर दुकान नाही तर तुमची बिल्डिंग परमिशनच अडवू', यांची दर्पोक्ती... कॉर्पोरेशनच्या पहिल्या मजल्यावर यांच्या येरझारा... हे साहेब- ते राव सर्वांना हे दमात घेणार किंवा दाम देणार... मिळकती गिळणाऱ्यांना धडा शिकविणार... धडा शिकविणार आम्ही धडा शिकविणार... 
सगळेच पक्ष सारखे... एकाच माळेतले... सर्वांमध्ये गुंडांची भरती... गुंड उमेदवारांना धडा शिकविणार... 
पक्ष नव्हे लोकशाही सडली... किडली... वाकली... मोडली... फुटली... लोकशाही सडविणाऱ्यांना धडा शिकविणार... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com