निवडणुका चेकवर नव्हे, नोटांवर लढल्या जातात

Farooq_Abdullah
Farooq_Abdullah

मुंबई : "निवडणुकांमध्ये हेलिकॉप्टर व विमान प्रवासासाठी, जाहिरातबाजीसाठी कोणता पैसा वापरला गेला? देशात काळ्या पैशाशिवाय निवडणुका लढता येतात का? किंवा लढल्या गेल्या आहेत का? निवडणुकांमध्ये कोणीही चेक देत नाही, सगळेच नोटा देतात,'' अशी टीका माजी केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांनी रविवारी (ता. 20) येथे केली.

एका कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत अब्दुल्ला बोलत होते. ""नोटा मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे, पण निर्णयाच्या अंमलबजावणीत ढिसाळपणा आणि नियोजनचा अभाव आहे,'' असेही अब्दुल्ला म्हणाले. ""नोटा बदलल्या म्हणजे काळा पैसा संपला असा अर्थ होतो का? भाजी खरेदीसाठी वापरण्यात येणारी नोट व काळा पैसा यात फरक करता येतो का? तर नाही,'' अशी टिप्पणीही त्यांनी केली.

""जुन्या आणि नव्या नोटांचे व्यवस्थापन करणे गरजेचे होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जुन्या नोटा बाद करायला हव्या होत्या. रांगेत मृत्युमुखी पडणारी माणसे, बॅंक कर्मचारी ही शोकांतिका आहे. तसे घडायला नको होते,'' अशी व्यथाही त्यांनी व्यक्त केली.

जगभरात अनेक देशांमध्ये समांतर पद्धतीच्या अर्थव्यवस्था चालतात असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेश, गुजरात आणि गोव्यात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या निमित्ताने काळ्या पैशांची झळ कोणत्या राजकीय पक्षांना किती बसली ही गोष्ट स्पष्ट होईल असेही भाकित त्यांनी केले.

संरक्षणमंत्र्यांचे आरोप बिनबुडाचे
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेले दहशतवादाशी संबंधित नोटाफेकीचे आरोप बिनबुडाचे आहेत, असे फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले. काश्‍मीरमध्ये 135 दिवसांनंतरही लोकांची मने धुमसतच आहेत. बड्या नेत्यांपेक्षा सर्वसामान्यांशी बोलल्यावर याचा अनुभव येईल. काश्‍मीरमध्ये शांतता नांदू शकते, पण जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात संवाद घडत नाही, तोपर्यंत शांतता अशक्‍य असल्याचेही ते म्हणाले. युद्ध हा काश्‍मीरच्या प्रश्‍नावरचा उतारा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com