राज्यात धावणार इलेक्‍ट्रिक बस - मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

नागपूर - संपूर्ण राज्यात वातानुकूलित इलेक्‍ट्रिक बसचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इलेक्‍ट्रिक बसच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याचे नमूद करीत योग्य दराचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या. 

नागपूर - संपूर्ण राज्यात वातानुकूलित इलेक्‍ट्रिक बसचा मार्ग मोकळा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इलेक्‍ट्रिक बसच्या प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याचे नमूद करीत योग्य दराचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या. 

रामगिरी येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शहरातील विविध प्रकल्प, विकास कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीत ते बोलत होते. इलेक्‍ट्रिक बस तयार करणाऱ्या ओलेक्‍ट्रा ग्रीन टेक लिमिटेडतर्फे इलेक्‍ट्रिकवर चालणाऱ्या बसचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. प्रदूषण विरहित असलेली इलेक्‍ट्रिक बस इंधनापेक्षा कमी खर्चाची असल्यामुळे या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे.

इलेक्‍ट्रिक बस वातानुकूलित असून भाडेसुद्धा कमी राहणार आहे. या बस चालविण्यासंदर्भात संबंधित कंपनीने सकारात्मक व योग्य दराचा प्रस्ताव सादर केल्यास राज्यात इलेक्‍ट्रिक बस चालविण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मिहान परिसरात जागतिक दर्जाचे अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर बांधकामासंदर्भात यावेळी सादरीकरण करण्यात आले. १०८ हेक्‍टर जागेवर प्रस्तावित कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एकाच वेळी १० हजार व्यक्ती बसू शकतील, अशी सुविधा उपलब्ध राहणार आहे. 

देश व विदेशातील उद्योजक, नागरिक, खेळाडू आदींचे आकर्षण ठरेल यादृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिहानच्या अधिकाऱ्यांना केली. कन्व्हेन्शन सेंटरसाठी आवश्‍यक साहाय्य केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येईल. यासाठी ट्रायकॉनतर्फे सुंदर व आकर्षक आराखडे तयार करण्यात आले आहेत. नागपूरचे व सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले काळे यांनी या कन्व्हेन्शन सेंटरचा आराखडा तयार केला असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

Web Title: Electric Bus in State