राज्यात वीज मागणीचा उच्चांक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - महावितरणने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च वीजमागणीचा उच्चांक गाठत सर्वाधिक वीजपुरवठा करण्यात यश मिळवले आहे. मंगळवारी राज्यात 19 हजार 816 एवढ्या मेगावॉट विजेचा यशस्वीपणे पुरवठा करत महावितरणने नवा विक्रम केला; तर मुंबईतही सर्वाधिक वीजमागणीची नोंद झाली.

मुंबई - महावितरणने यंदाच्या हंगामातील सर्वोच्च वीजमागणीचा उच्चांक गाठत सर्वाधिक वीजपुरवठा करण्यात यश मिळवले आहे. मंगळवारी राज्यात 19 हजार 816 एवढ्या मेगावॉट विजेचा यशस्वीपणे पुरवठा करत महावितरणने नवा विक्रम केला; तर मुंबईतही सर्वाधिक वीजमागणीची नोंद झाली.

राज्यात महावितरणच्या कार्यक्षेत्रात ही विजेची कमाल मागणी नोंदविण्यात आली. याआधी गेल्या वर्षी मार्च महिन्यात 19 हजार 700 मेगावॉट विजेचा पुरवठा महावितरणकडून करण्यात आला होता.

राज्यात वीजयंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचा हा परिणाम असल्याचा महावितरणचा दावा आहे; तसेच या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामेही नियमितपणे केली जातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील विजेच्या मागणीचा पुरवठा महावितरणला पूर्ण करता येणे शक्‍य झाले आहे, असे कंपनीचे म्हणणे आहे.

सध्या महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून 6500 मेगावॉट, केंद्रीय प्रकल्पातून 4500, खासगी प्रकल्पातून दीर्घ मुदतीच्या कराराद्वारे सुमारे 4200 मेगावॉट, लघू मुदतीच्या कराराद्वारे सुमारे 635 मेगावॉट; तर इतर विविध स्रोतांकडून सुमारे 3981 मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे.

मुंबईची विजेची सर्वोच्च कमाल मागणी 17 एप्रिलला 3542 मेगावॉट एवढी नोंदविण्यात आली. मुंबईच्या तापमानातील वाढीचा परिणाम हा विजेच्या मागणीवरही झालेला पाहायला मिळाला; तर संपूर्ण राज्याची विजेची कमाल मागणी 23 हजार 358 मेगावॉट एवढी नोंदविण्यात आली.

19 हजार 816 मेगावॉट - महावितरणकडून वीजपुरवठा
19 हजार 700 मेगावॉट - गेल्या मार्चमध्ये केलेला वीजपुरवठा

Web Title: electricity demand highest

टॅग्स