राज्यातील ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

राज्यात उन्हाच्या झळा तीव्र होत असतानाच वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी) आदेशानुसार राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसणार आहे.

मुंबई - राज्यात उन्हाच्या झळा तीव्र होत असतानाच वीज नियामक आयोगाच्या (एमईआरसी) आदेशानुसार राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसणार आहे. एक एप्रिलपासून राज्यातील वीजदरात १ ते ३ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. मुंबईतील विजेची बेस्टकडून कोणतीही दरवाढ झालेली नसल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. मात्र मुंबई शहर वगळता राज्यातील ग्राहकांना वीज दरवाढीचे चटके सहन करावे लागणार आहेत.

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने १२ सप्टेंबर २०१८ रोजी वीज कंपन्यांच्या नवीन दरांना मान्यता दिली. त्यानुसार महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांचे वीज दर वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अदानी कंपनीला १ टक्का दरवाढ, टाटा पॉवरला २ टक्के, महावितरण ६ टक्के आणि बेस्ट ३ टक्के अशा नवीन दरांना मान्यता मिळाली आहे. महावितरण सरासरी ३ टक्के वाढ करणार आहे. उपनगरामध्ये अदानी कंपनीचे सुमारे २७ लाख ग्राहक आहेत. या ग्राहकांना १ तारखेपासून नवीन दर लागू होतील, तर टाटाच्या ग्राहकांना २ टक्के भुर्दंड सहन करावा लागणार आहे. बेस्टला दरवाढीतून दिलासा देण्यात आला आहे. बससेवेचा तोटा भरून काढण्यासाठी वीज ग्राहकांवर बोजा टाकण्यात येत होता; परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन तोटा भरून काढण्यासाठी यापूर्वी वसूल केलेली रक्कम परत केली जात आहे. यामुळे बेस्टचे वीज दर सरासरी तीन टक्‍क्‍यांनी कमी होणार आहेत. यामुळे मुंबईतील ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. 

टाटा कंपनी 
- ० ते १०० पर्यंत प्रतियुनिट - ४ रुपये ५४ पैसे 
- १०१ ते ३०० पर्यंत प्रतियुनिट - ७ रुपये ६७ पैसे 
- ३०१ ते ५०० पर्यंत प्रतियुनिट - १२ रुपये १७ पैसे 
- ५०१ ते १००० पर्यंत प्रतियुनिट - १४ रुपये ७४ पैसे 

अदानी 
- १०० पर्यंत प्रतियुनिट ४.७७ रुपये 
- ३०० पर्यंत प्रतियुनिट ७ रुपये ९० पैसे 
- ५०० पर्यंत प्रतियुनिट ९ रुपये २९ पैसे

महावितरणची दरवाढ
युनिट                   जुना दर      नवीन दर (प्रतियुनिट)

० ते १००          ५ रुपये ३१ पैसे      ५ रुपये ४८ पैसे 
१०१ ते ३००      ८ रुपये ९५ पैसे      ९ रुपये २६ पैसे 
३०१ ते ५००     ११ रुपये ५७ पैसे      ११ रुपये ७५ पैसे 

Web Title: Electricity Rate Increase