महाराष्ट्र : अकरावीचे ऑनलाईन प्रवेश सोमवारपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

ऑफलाईन पद्धतीने प्रवेश
- रात्र उच्च माध्यमिक विद्यालये
- सैनिकी उच्च माध्यमिक विद्यालये
- अपंग विद्यार्थ्यांच्या विशेष शाळा

मुंबई-पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा पहिला टप्पा
मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे अर्ज भरण्यास सोमवारपासून (ता. 27) सुरवात होणार आहे. विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला टप्पा भरता येणार असून, त्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शाळांना माहिती पुस्तिका पाठवल्या आहेत. प्रथम मुंबई आणि पुणे या विभागांतील प्रवेश प्रक्रिया सुरू होत असून, उर्वरित चार विभागांतील प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक व औरंगाबाद महापालिकांच्या कार्यक्षेत्रांत राबवण्यात येत आहे. शिक्षण संचालनालयाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. मुंबई आणि पुणे शिक्षण उपसंचालक विभागांमधील दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावीतील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरता येतील. विभाग कार्यालयांमार्फत ही सुविधा सोमवारपासून सुरू होईल, असे मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

यंदा मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयाने प्रवेश प्रक्रियेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्यासाठी दोन लाख 82 हजार पुस्तिकांची छपाई केली आहे. या माहिती पुस्तिकांचे वितरण मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पनवेल आदी विभागांत झाले आहे. शनिवारपर्यंत (ता.25) सर्व शाळांपर्यंत या माहिती पुस्तिका पोचतील, असे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Eleventh Online Admission from Monday Start Education