सुधा भारद्वाज यांची हायकोर्टात धाव 

सुधा भारद्वाज यांची हायकोर्टात धाव 

मुंबई -  एल्गार परिषदेशी संबंधित असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 18 फेब्रुवारीला न्या. एन. डब्लू. साम्ब्रे यांच्यासमोर सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. 

एल्गार परिषदेशी संबंधित पुरेसे पुरावे पुणे पोलिसांकडे आहेत, असे नमूद करत ऑक्‍टोबर 2018 मध्ये पुणे सत्र न्यायालयाने भारद्वाज यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भारद्वाज यांच्यासंदर्भात पोलिसांनी सादर केलेले पुरावे विश्‍वासार्ह नाहीत. ते पुरावे भारतीय पुरावा कायद्यानुसार ग्राह्य धरता येत नाहीत, असा दावा भारद्वाज यांच्या वतीने वकील युग चौधरी यांनी केला आहे. 

पुण्याजवळ भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. त्याचा कट एल्गार परिषदेत आखण्यात आला होता, असा आरोप पुणे पोलिसांनी ठेवला आहे. माओवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांनी मागील वर्षी जून आणि ऑगस्टमध्ये देशभरातून 10 जणांना अटक केली होती. पुण्यातील शनिवारवाड्याच्या प्रांगणात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेच्या आयोजनात नक्षलवादी संघटनांचा हात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. 

कोण आहेत सुधा भारद्वाज 
सुधा भारद्वाज यांची आई कृष्णा भारद्वाज या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाच्या अधिष्ठात्या होत्या. सुधा यांचे प्राथमिक शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. सुधा भारद्वाज या आयआयटी कानपूरच्या 1978 मधील तुकडीच्या "टॉपर' आहेत. त्यांनी 2000 मध्ये रायपूर येथील पंडित रविशंकर शुक्‍ला विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. दिवंगत कामगार नेते शंकर गुहा नियोगी यांच्या कार्याने प्रभावित होऊन त्या डाव्या चळवळीशी जोडल्या गेल्या. कामगार क्षेत्रात 30 वर्षांपासून कार्यरत असलेल्या सुधा भारद्वाज मानवाधिकार चळवळीतील महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. त्या छत्तीसगड पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संघटनेच्या सरचिटणीस आणि जनहित संघटनेच्या संस्थापक आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com