वर्षपूर्तीलाच "शिवशाही'वर दगडांचा वर्षाव ; 48 तासांत 19 बस फोडल्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 जून 2018

9 जून 2017 ला मुंबई-रत्नागिरी मार्गावर पहिली शिवशाही बस धावली होती. त्यानिमित्त शिवशाहीच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे नियोजन महामंडळाने केले होते; मात्र अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी अघोषित संप पुकारल्याने प्रशासनाला हा कार्यक्रम गुंडाळावा लागला.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) सुरू केलेल्या वातानुकूलित शिवशाही बसला शनिवारी (ता. 9) एक वर्ष पूर्ण झाले अन्‌ याच दिवशी या बसवर दगडफेक झाली. राज्यभरात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. गेल्या 48 तासांत संपादरम्यान 19 शिवशाही बस फोडण्यात आल्याचे उघड झाले. 

9 जून 2017 ला मुंबई-रत्नागिरी मार्गावर पहिली शिवशाही बस धावली होती. त्यानिमित्त शिवशाहीच्या वर्षपूर्ती सोहळ्याचे नियोजन महामंडळाने केले होते; मात्र अचानक एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी अघोषित संप पुकारल्याने प्रशासनाला हा कार्यक्रम गुंडाळावा लागला. दापोली-मुंबई शिवशाही बसवर मंडणगड मार्गावरील पिसई येथे दगडफेक झाली. सावंतवाडी आगाराच्या औरंगाबाद-सावंतवाडी या बसवर कणकवलीनजीक अनोळखी व्यक्तीने दगड मारल्याने बसची मागील काच फुटली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. शिरोली नाका येथे "कोल्हापूर-मुंबई' या स्लीपर कोच शिवशाही बसवर दगडफेक झाली. 

एसटीच्या ताफ्यात दोन हजार शिवशाही बस टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत. सध्या 838 शिवशाही बस राज्यातील विविध 276 मार्गांवर धावत आहेत. या बस भाड्याने घेण्यात आल्या आहेत. गाडीचे भाडे, डिझेल खर्च आणि वाहकाचा पगार महामंडळालाच द्यावा लागतो. आधीच तोट्यात चाललेल्या एसटीच्या बसवर संपादरम्यान दगडफेक झाल्याने महामंडळाला त्याचा फटका बसला आहे. 

Web Title: At the end of the year the stone pelting on Shivshahi has broken 19 buses in 48 hours