विकासाला हातभार लावणाऱ्यांनाच भाजपत प्रवेश : तावडे

Vinod Tawde
Vinod Tawde

पुणे : ""भारतीय जनता पक्षात येण्यासाठी कुणालाही धाक दाखविण्याची आम्हाला गरज नाही. आमच्याकडे ओघ कायमच आहे. पण दोषारोप असलेल्या कुणाही नेत्याला पक्षात घेणार नाही. ज्यांचा विकासाला हातभार लागेल, त्यांनाच पक्षात प्रवेश दिला जाईल,'' अशी स्पष्टोक्‍ती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. विधानसभेत यावेळी महायुतीला 220 हून अधिक जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांबाबत बैठक आयोजिली होती. त्यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांना पक्ष प्रवेशासाठी दबाव टाकला जात असल्याबद्दल तावडे यांना विचारले. त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला. पक्षाचे मूळ कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर, विकासाला हातभार लावणाऱ्यांनाच पक्षात प्रवेश दिला जात असल्याचे ते म्हणाले. 

शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा? या प्रश्‍नावर, ""भाजप, शिवसेना, रासप आणि मित्रपक्षांचा मुख्यमंत्री होईल,'' असे उत्तर देत याप्रश्‍नी अधिक बोलणे त्यांनी टाळले. मात्र, महायुती "अब की बार 220 पार' म्हणत विधानसभेत पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा दावा त्यांनी केला. 

अभिजात दर्जा मिळणारच 
मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाबाबत तावडे म्हणाले, ""अभिजात भाषेचा अहवाल केंद्राकडे पाठविलेला आहे. परंतु, तमीळ भाषेच्या प्रश्‍नावरून न्यायालयीन प्रकरण झाल्याने पुढील कार्यवाही रखडली होती. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळाकडून हा अहवाल साहित्य अकादमीच्या भाषातज्ज्ञ समितीकडे गेला होता. या समितीचा अहवाल मंत्रिमंडळाकडे आला आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अंतिम टप्प्यात आहे.'' संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, या वादावरून दर्जा रखडला का असे विचारता, "असा कोणताही वाद नाही. मराठीला दर्जाबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय बाकी आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले. 

"सीबीएसई'ला मराठीची सक्ती 
महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी भाषा आली पाहिजे. शिक्षणातही त्याची सक्ती केलेली आहे. सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या शाळांनाही मराठी सक्तीची केली जाईल. ज्या शाळा करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईबाबत विचार करू. सध्या पहिली ते आठवीपर्यंत मराठी आहेत. त्यापुढील वर्गांनाही सक्तीचा विचार सुरू आहे, असे तावडे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com