esakal | इथेनॉलकडे 20 लाख टन साखर उत्पादन वळण्याची शक्‍यता !
sakal

बोलून बातमी शोधा

Ethanol

"इस्मा'ने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात देशातील ऊस क्षेत्राच्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या प्रतिमा प्राप्त झाल्या आहेत. या प्रतिमांमुळे यंदा कापणी झालेला ऊस, शिल्लक ऊस, आतापर्यंतचे ऊस उत्पादन, साखर उतारा, उर्वरित काळात अपेक्षित उत्पादन व साखर उतारा याचा आढावा इस्माने घेतला आहे. 

इथेनॉलकडे 20 लाख टन साखर उत्पादन वळण्याची शक्‍यता !

sakal_logo
By
प्रदीप बोरावके

माळीनगर (सोलापूर) : देशात एकूण 20.10 लाख टन साखर उत्पादन यंदाच्या हंगामात इथेनॉल निर्मितीकडे वळण्याची शक्‍यता आहे. साखर उत्पादन घटवून इथेनॉलकडे वळण्यामध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व कर्नाटक या साखर उत्पादन करणाऱ्या प्रमुख तीन राज्यांचा 93 टक्के वाटा असणार आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) जाहीर केलेल्या सांख्यिकी माहितीनुसार ही बाब समोर आली आहे. 

"इस्मा'ने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात देशातील ऊस क्षेत्राच्या उपग्रहाद्वारे घेतलेल्या प्रतिमा प्राप्त झाल्या आहेत. या प्रतिमांमुळे यंदा कापणी झालेला ऊस, शिल्लक ऊस, आतापर्यंतचे ऊस उत्पादन, साखर उतारा, उर्वरित काळात अपेक्षित उत्पादन व साखर उतारा याचा आढावा इस्माने घेतला आहे. उसाचा रस व बी हेवी मोलॅसिस इथेनॉल निर्मितीकडे वळविण्यात आल्याने देशातील साखर उत्पादनात होणारी घट याचा अंदाज घेण्यात आला आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये यंदाच्या हंगामात 105 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. गतवर्षी तेथे 126.37 लाख टन साखर उत्पादन झाले होते. उसाचे कमी क्षेत्र, साखर उताऱ्यातील घट, गूळ उत्पादनासाठी झालेला उसाचा अधिक वापर, उसाचा रस व बी हेवी मोलॅसिसपासून मोठ्या प्रमाणावर होत असलेले इथेनॉल उत्पादन या कारणांमुळे उत्तर प्रदेशात साखर उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. चालू हंगामात तेथे 6.74 लाख टन साखर उत्पादन इथेनॉलकडे वळण्याची शक्‍यता आहे. मागील हंगामात तेथे 3.70 लाख टन साखर उत्पादन इथेनॉल निर्मितीसाठी वळविण्यात आले होते. 

महाराष्ट्रात यंदा 105.41 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी 61.69 लाख टन साखर उत्पादन राज्यात झाले होते. मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात यंदा अनुकूल हवामानामुळे उसाच्या क्षेत्रात झालेली 48 टक्के वाढ व ऊस उत्पादन चांगले मिळत असल्याने विक्रमी साखर उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्रात 6.55 लाख टन साखर उत्पादन इथेनॉलकडे वळण्याचा अंदाज आहे. गतवर्षी केवळ 1.42 लाख टन साखर उत्पादन इथेनॉलकडे वळविण्यात आले होते. 

कर्नाटकात यावर्षी 45.5 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. गतवर्षी तेथे 34.94 लाख टन साखर उत्पादन झाले होते. तेथे 5.41 लाख टन साखर उत्पादन इथेनॉलकडे वळण्याची आशा आहे. गतवर्षी तेथे 2.42 लाख टन साखर उत्पादन इथेनॉलसाठी वळविण्यात आले होते. इस्माने दुसऱ्या जाहीर केलेल्या सुधारित अंदाजानुसार तमिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगण, बिहार, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्ये एकत्रित मिळून 49.35 लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. या सर्व राज्यांत मिळून 1.40 लाख टन साखर उत्पादन इथेनॉलसाठी वळण्याची शक्‍यता आहे. 

यंदाच्या हंगामाच्या प्रारंभी 1 ऑक्‍टोबर 2020 रोजी देशात 107 लाख टन असलेला साखर साठा, 260 लाख टन देशांतर्गत साखरेचा खप, निर्यात होणारी 60 लाख टन साखर आणि यंदा होणारे 302 लाख टन अपेक्षित साखर उत्पादन या बाबी विचारात घेता 30 सप्टेंबर 2021 ला देशात 89 लाख टन शिल्लक राहणार आहे. 

साखर उद्योगाचे "एमएसपी'कडे लक्ष 
60 लाख टन साखर निर्यातीची घोषणा व 2020-21 साठी इथेनॉलच्या किमतीत केलेली सुधारणा हे दोन महत्त्वाचे निर्णय केंद्र सरकारने साखर कारखान्यांची तरलता सुधारण्यासाठी घेतले. याचे साखर उद्योगातून स्वागत होत आहे. मात्र, साखरेच्या "एमएसपी'वाढीचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्राने अद्याप घेतलेला नाही. साखर उद्योगाचे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image