Loksabha 2019 : सत्ताधाऱ्यांच्या आत्मविश्‍वासाचे कारण ईव्हीएम? 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 मे 2019

सत्ताधाऱ्यांच्या या आत्मविश्‍वासाचे कारण ईव्हीएम तर नाही ना, अशी दबक्‍या आवाजातली चर्चा सुरू असून त्यामुळेच कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमवर शंका घेतली आहे. 

मुंबई - लोकसभा निवडणुकांत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युती चमत्कार करील. बारामती, साताऱ्याच्या जागाही युती जिंकेल, असा दावा भाजप नेते करत असल्याने "सत्ताधाऱ्यांना एवढा आत्मविश्‍वास कुठून येतो?' असा सवाल विरोधकांमध्ये चर्चिला जात आहे. सत्ताधाऱ्यांच्या या आत्मविश्‍वासाचे कारण ईव्हीएम तर नाही ना, अशी दबक्‍या आवाजातली चर्चा सुरू असून त्यामुळेच कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएमवर शंका घेतली आहे. 

शिवसेनेचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी शिरूर लोकसभेत शिवसेनेचे उमेदवार 40 ते 75 हजार मतांनी विजयी होतील, असा दावा केल्यानंतर कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीत धास्तीचे चित्र आहे. प्रशांत किशोर यांनी केवळ शिरूरच्या विजयाचाच दावा का केला, असा सवाल विरोधक करीत असून यामागे मतदारांची "मानसिकता' तयार करण्याची खेळी असल्याचा संशय राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी व्यक्‍त केला. 

दरम्यान, कॉंग्रेसने ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूममधे जॅमर बसवा, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे; तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्ट्रॉंग रूममधे उमेदवारांना जाण्यास बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. 23 तारखेला मतमोजणी होणार असल्याने सर्वच उमेदवारांत धास्ती वाढली असून ईव्हीएमची वाढती चर्चा ऐकून विरोधी पक्षाचे उमेदवार चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे. 

याउलट भाजपचे नेते चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन युतीच्या विजयाबाबत आत्मविश्‍वासाने बोलत आहेत. बारामतीदेखील या वेळी जिंकणार असा दोघांनीही दावा केला आहे. विरोधकांना पराभव दिसत असल्याने ईव्हीएमचा विषय पुढे करत असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. 

इलेक्‍ट्रॉनिक साधनांमध्ये फेरफार सहज शक्‍य : आंबेडकर 
वंचित बहुजन विकास आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी तर थेट ईव्हीएममधे फेरफार शक्‍य असल्याचा दावा केला आहे. भारतीय जनता पक्ष यासाठी प्रयत्नशील असल्यानेच व्हीव्हीपॅटमधील 50 टक्‍के स्लिप मोजण्यास त्यांचा नकार असल्याचा आरोप केला आहे. ज्या ज्या ठिकाणी इलेक्‍ट्रॉनिक साधन असते ते सर्व हॅक करणे सहज शक्‍य असल्याचे सांगत जगभरातील अनेक तंत्रज्ञांनी ईव्हीएम हॅक होऊ शकते यावर शिक्‍कामोर्तब केल्याचे ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: EVM because of the confidence of the ruling party