माजी नगरसेवकाने दिले दातृत्वाचे उदाहरण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

बारामती शहर - समाजातील दीन दुबळ्या लोकांची सेवा करावी अशा आशयाच्या हजारो पोस्ट आपण दररोज सोशल मीडियावर वाचतो, पण एखादा दीन दुबळा दिसल्यानंतर त्याला खिशातून पैसे काढून मदत करण्याची दानत मात्र फार कमी लोकांमध्ये असते. बारामतीचे माजी नगरसेवक अनिल कदम यांनीही काल असेच एक दातृत्वाचे उदाहरण दाखवून दिले.

बारामती शहरामध्ये भिगवण चौकांमध्ये लक्ष्मण नाना वणवे हा दोन्ही पायांनी दिव्यांग असलेला युवक दररोज येतो व मिळेल ते घेऊन स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करतो. त्याला दोन्ही पायांनी चालत येत नाही, अक्षरशः सरपटत तो रस्त्यावरून चालत असतो. अतिशय केविलवाण्या स्थितीत चालताना पाहून अनिल कदम यांचे मन द्रवले. त्यांनी या युवकाला मदत करण्याचा निश्चय करत थेट बारामती शहरातील सर्जिकल उपकरणांचे दुकान गाठले. त्याच्यासाठी साडेपाच हजार रुपयाची तीन चाकी सायकल ते घेऊन आले आणि त्या युवकाला ती फोल्डेबल तीन चाकी सायकल दिली. ही सायकल मिळाल्यानंतर लक्ष्मण वणवे याच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता.

गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्मण वणवे याला सरपटत चालताना पाहून मन व्यथित होत होते, याला कोणत्याही परिस्थितीत मदत करायची असा निर्णय मी घेतला होता. केवळ त्याला त्रास होऊ नये या एकमेव भावनेतून आपण मदत केल्याचे अनिल कदम यांनी नमूद केले. अनिल कदम यांनी उस्फूर्तपणे केलेल्या मदतीचे बारामतीकरांनी मनापासून कौतुक केले. 

नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ ,मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर पाटसकर ,सिद्धनाथ भोकरे ,नगरसेवक सत्यव्रत काळे आदींच्या उपस्थितीत लक्ष्मण वणवे याला तीन चाकी सायकल प्रदान केली गेली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ex. Corporator helped handicap