परीक्षा शुल्क 10 टक्‍क्‍यांनी वाढणार 

 सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 19 जून 2019

दोन परीक्षा झाल्यानंतर परीक्षा शुल्क वाढते. परंतु, मागील दोन वर्षांपासून परीक्षा शुल्कात वाढ झालेली नाही. आता पेपर महागाला असून परीक्षा पद्धतीत काही बदल केल्याने परीक्षा विभागाचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे 10 टक्‍क्‍यांनी परीक्षा शुल्क वाढीचा प्रस्ताव आहे. 
- डॉ. श्रीकांत कोकरे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

सोलापूर : माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर शिक्षणच्या परीक्षा शुल्कात 10 टक्‍क्‍यांची वाढ करावी, असा प्रस्ताव पुणे बोर्ड व विद्यापीठांकडून तयार करण्यात आला आहे. आता तो सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील दुष्काळात संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना यावर्षी याचा फटका सोसावा लागणार आहे. 

राज्यातील भयावह दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्‍यांमधील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफी जाहीर केली. परीक्षा शुल्क माफीची रक्‍कम अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. तोवर पुणे बोर्डाने परीक्षा शुल्क वाढीचा प्रस्ताव तयार केला असून सोलापूरसह अन्य विद्यापीठांनी परीक्षा शुल्क वाढीची तयारी केली आहे. त्यामुळे माध्यमिक, उच्च माध्यमिक व पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या राज्यातील 45 लाख विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे.

पेपरच्या किमती वाढल्या असून परीक्षांवरील होणारा खर्च आणि सध्याचे मिळणारे परीक्षा शुल्क यामध्ये मोठी तफावत असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. त्यातच मागील दोन वर्षांपासून परीक्षा शुल्कात कोणतीही वाढ न केल्याचा फटका बोर्डासह विद्यापीठांना सहन करावा लागतोय, असेही प्रस्तावात म्हटले आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

विद्यार्थ्यांची संख्या 
माध्यमिक विभाग : 16.37 लाख 
उच्च माध्यमिक : 14.23 लाख 
अभियांत्रिकीसह अन्य शाखा : 15.30 लाख 
परीक्षा शुल्क वाढ : 10 टक्‍के 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: exam fee to hike by 10 percent