नंदिवर्धनमधील उत्खननात वाकाटक राजवंश घराण्यावर प्रकाशझोत

दिलीप कुऱ्हाडे
शुक्रवार, 11 मे 2018

येथील पुरातत्त्वीय साधनांचा वापर करून सातवाहन वंशज कोण होते, वाकाटक आणि सातवाहन यांच्यामध्ये साम्य होते का वेगळे याचा निष्कर्ष काढला जाणार असल्याची माहिती डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली.

पुणे : नागपूरातील रामटेक येथे प्राचिन नंदिवर्धन या वाकाटक राजवंशाच्या राजधानीचे शहराचे उत्खनन केले आहे. येथील पुरातत्त्वीय साधनांचा वापर करून सातवाहन वंशज कोण होते, वाकाटक आणि सातवाहन यांच्यामध्ये साम्य होते का वेगळे याचा निष्कर्ष काढला जाणार असल्याची माहिती डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली.

excavation

या संदर्भात शिंदे म्हणाले, ‘‘डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभाग, नागपूर येथील राज्य पुरातत्त्व आणि वस्तु संग्रहालये आणि प्राचिन भारत इतिहास संशोधन यांच्या संयुक्त विद्यमाने वाकाटक दोन वर्षांपासून उत्खनन सुरू होते. सातवाहन वंशजांचा कालखंड इसपूर्व दुसरे व तिसरे शतक आहे. तर वाकाटक राजवंशान इ.स. तिसरे शतक उत्तरार्ध आणि इ.स.पाचवे शतक उत्तरार्ध या दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशातील काही प्रदेशांवर राज्य केले. वाकाटक राजवंशाने नंदिवर्धन ( आजचे नगरधन )हून अकरा ताम्रपट लिहिले होते. ज्यावरून वाकाटक साम्राजाच्या इतिहासात प्राचित नगरधनचे महत्त्व सिद्ध होते. मात्र पुरातत्वीय साधनांच्या माध्यमातून संशोधन करणे आवश्‍यक होते.

इ.स.350 च्या दरम्यान वाकाटक सम्राट पृथ्विषेण यांनी वाकाटक साम्राज्याची राजधानी पद्‌मपुर वरून नंदिवर्धनला स्थलांतरित केली. जे वाकाटक पूर्वकालीन नागरवस्तीचे शहर होते. याचे पुरातत्त्वीय शहानिशा केले. वाकाटक कालखंडातील वसाहतीक रचना आणि नगररचने बाबत माहिती मिळते. येथील मध्ययुगीन किल्ल्याच्या परिसरात उत्खननात प्रारंभिक लोह युगाशी संबंधित बांधकामे अवशेष आढळून आले आहेत.

फरसबंदीच्या अवशेषांखालील स्तरातून अनुक्रमणे वाकाटक, मौर्य कालखंड आणि प्रारंभिक लोह युगाशी संबंधित बांधकामचे अवशेष सापडले.
उत्खननात नाणी, मुद्रा, मृण्मयी मूर्ती, वस्तू, दगडी प्रतिमा आणि हाडाच्या हस्तदंती वस्तू, मणी, बांगड्या आदि पुरावशेषांचा समावेश होता. घोडा, बैल, हत्ती, चिमणी, मासा, बदक, आदींच्या मृण्मय प्रतिमा मिळाल्या आहेत. या प्रतिमांचा खेळणी म्हणून किंवा धार्मिक विधींसाठी वापर होत असावा. आभूषणांमध्ये कर्णभूषणे, बांगड्या, पदके आणि मणी यांचा समावेश आहे. दगडी वस्तूंमध्ये दैनंदिन जीवनात उपयोगात येणाऱ्या वस्तुसोबत धार्मिक जीवनाशी निगडीत प्रतिमा ज्यात नरसिंह, विष्णु, गणपती, योगेश्‍वरी, लज्जागौरी आदींच्या प्रतिमेंचा समावेष आहे. येथील उत्खननात डॉ. विराग सोनटक्के, डाॅ. शंतनू वैद्य आणि श्रीकांत गणवीर यांनी संशोधन केल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Excavation in nandiwardhan found vakatak Dynasty