esakal | कोरोनाबाधितांच्या उपचार पद्धतीची तज्ज्ञ डॉक्‍टर करणार पाहणी 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

अशी आहे समिती 
समितीच्या अध्यक्षपदी पुण्याच्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. शशिकला सांगळे, सदस्यपदी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. व्यंकटेश जोशी, नांदेडच्या श्री. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय कापसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमधील डॉक्‍टर औषध वैद्यकशास्त्र, बधिकरणशास्त्र आणि छाती व क्षयरोगशास्त्राचे तज्ज्ञ आहेत. ही समिती सोलापूर येथील कोविडच्या परिस्थितीचा आढावा घेऊन वाढत्या मृत्यूदराची समीक्षा करणार आहे. कोविड रुग्ण असणाऱ्या दवाखान्यांना भेटी देऊन उपचार पद्धतीची माहिती घेणार आहेत. योग्य प्रमाणित उपचार पद्धती निश्‍चित करणार आहेत. ही समिती तीन आठवडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि कोविड रुग्णालयांना भेटी देणार आहेत. 

कोरोनाबाधितांच्या उपचार पद्धतीची तज्ज्ञ डॉक्‍टर करणार पाहणी 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या वाढत असतानाच कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तीचीही संख्या वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे. सोलापुरात कोरोनामुळे मृत्यूची संख्या का वाढत आहे? सोलापुरातील खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर केली जाणारी उपचार पद्धती योग्य आहे का? या उपचार पद्धतीत काय बदल करावेत? याबाबतचा अभ्यास करण्यासाठी सोलापुरात तज्ज्ञ डॉक्‍टरांची समिती दाखल झाली आहे. 

सोलापूर शहरात 12 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण मयत झाल्यानंतर तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या हात सोलापुरातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. शुक्रवारच्या (ता. 4) अहवालानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2976 एवढी तर कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या 287 झाली आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत अधिकाधिक भरच पडत आहे. महापालिका हद्दीतील व्यक्तींच्या कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित रहात नव्हते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अहवाल प्रलंबित राहू लागल्याने कोरोनाची चिंता वाढली आहे. सोलापूर शहरात कोरोनाचा असलेला धोका आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी या तालुक्‍यांनाही पोहोचू लागला आहे. या भागातही कोरोनाबाधितांची व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर सोलापुरातील कोरोनाग्रस्तांवरील उपचार पद्धतीचा अभ्यास, वाढता मृत्यूदर यावर अभ्यास करण्यासाठी आलेली समिती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

सोलापूर शहरासाठी तीन तज्ज्ञ डॉक्‍टरांची नियुक्त समिती राज्य सरकारने नियुक्त केली आहे. ही समिती सोलापुरात दाखल झाली असून तीन आठवडे ही समिती सोलापुरातच थांबणार आहे. सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपचार पद्धती निश्‍चित करणार आहे. राज्य शासनाच्या सूचनेनुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी समितीची स्थापना केली आहे.