द्रुतगती मार्गांवरील 21 पादचारी पुलांचे मजबुतीकरण 

द्रुतगती मार्गांवरील 21 पादचारी पुलांचे मजबुतीकरण 

मुंबई - पूर्व व पश्‍चिम द्रुतगती मार्गांवरील सर्व 21 पादचारी पुलांचे मजबुतीकरण, रस्त्यांवरील दुभाजक आणि उड्डाणपुलांखालील परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. या पादचारी पुलांवरील छप्पर बदलण्याचे तसेच पुलावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी जाहिरातींचे फलक काढण्याचे आदेशही एमएमआरडीएचे आयुक्त ए. आर. राजीव यांनी दिले आहेत. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेनंतर सर्व सरकारी यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. एमएमआरडीएनेही पादचारी पुलांचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पश्‍चिम द्रुतगती मार्गावरील आठ पुलांचे संरचनात्मक परीक्षण (स्ट्रक्‍चरल ऑडिट) व्हीजेटीआयमार्फत सुरू आहे. पूर्व द्रुतगती मार्गावरील 13 पादचारी पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

पूर्व आणि पश्‍चिम द्रुतगती मार्गांवरील दिशादर्शक फलकांची मजबुती तपासली जाणार आहे. रस्त्यांवरील दुभाजक आणि उड्डाणपुलांखालील परिसराचे सुशोभीकरण केले जाईल, असे सांगण्यात आले. पादचारी पुलांवर छपरांमुळे अतिरिक्त भार पडतो. पूल कमकुवत होण्याचे हेही एक कारण आहे. या पुलांचे मजबुतीकरण केले जाईल, असे एमएमआरडीए आयुक्त ए. आर. राजीव यांनी सांगितले. 

पांढरा, राखाडी रंग 
एमएमआरडीएच्या अखत्यारीतील पादचारी पुलांची रंगरंगोटीही केली जाणार आहे. त्यासाठी पांढरा आणि राखाडी हे रंग वापरले जातील. त्यामुळे पुलांच्या परिसराला उजाळा मिळेल, असे एमएमआरडीए आयुक्त म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com