‘द्रुतगती’वरील प्रवास होतोय सुकर!

‘द्रुतगती’वरील प्रवास होतोय सुकर!

पुणे - अचानक थांबणाऱ्या वाहनांना अटकाव, चालकांना प्रशिक्षण, लेनची शिस्त पाळण्यासाठी केलेला आग्रह आदी विविध कारणांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातांमधील बळींची संख्या घटली आहे. मात्र, होणाऱ्या बहुतेक अपघातांमध्ये सीट बेल्टचा वापर न करणे, हे एक प्रमुख कारण असल्याचेही अभ्यासातून निष्पन्न झाले आहे. 

सेव्ह लाइफ फाउंडेशन, राज्य रस्ते विकास महामंडळ, महिंद्रा अँड महिंद्रा, महामार्ग पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘झिरो फॅसिलिटी कॉरिडॉर इनिशिएटिव्ह’ प्रकल्प चार वर्षांपासून राबविण्यात येत आहे. द्रुतगती मार्गावर २०१६ मध्ये प्रत्येक दोन किलोमीटरवर तिघांचा प्राणांतिक मृत्यू झाला होता, तर राष्ट्रीय सरासरी त्यावर्षी प्रत्येक दोन किलोमीटरवर एकाचा मृत्यू होत होता. त्यामुळे राष्ट्रीय सरासरीपेक्षा प्राणांतिक अपघातांचे प्रमाण जास्त असल्यामुळे द्रुतगती मार्ग हा अपघातांचा सापळा झाला होता. त्यानंतर द्रुतगती मार्गाचा सविस्तर अभ्यास संयुक्तपणे करण्यात आला. त्यात २७ ठिकाणी तीव्र वळण, तीव्र उतार, चढ, सर्व्हिस लेनमध्ये समस्या आढळून आल्या. तसेच रस्त्याच्या अभियांत्रिकीबाबतही उपाययोजनांचा आराखडा निश्‍चित करून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच गेल्या चार वर्षांत मार्गावर २७०० ठिकाणी रस्त्यांची चिन्हे लावण्यात आली. ५०० ट्रकचालकांना प्रशिक्षण देण्यात आले. महामार्ग पोलिस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी, ‘एमएसआरडीसी’चे कर्मचारी आणि अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळेही अपघातांचे प्रमाण घटल्याचा दावा चार संस्थांनी संयुक्त निवेदनात केला आहे. 

७८ टक्के मृत्यू सीटबेल्ट नसल्यामुळे 
द्रुतगती मार्गावर वाहने भरधाव चालविल्यामुळे ५१ टक्के, रस्त्यावर वाहने थांबविल्यामुळे ३२ टक्के, चालक पेंगल्यामुळे २८ टक्के, लेन कटिंगमुळे १९ टक्के, तर पादचाऱ्यांमुळे १६ टक्के अपघात झाले आहेत. तसेच सीटबेल्टचा वापर न केल्यामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण तब्बल ७८ टक्के असल्याचे महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीमधून निष्पन्न झाले आहे.

मोटार वाहनच्या नव्या कायद्याची नेमकी अंमलबजावणी तसेच द्रुतगतीवर ‘नो पार्किंग’ची कठोर अंमलबजावणी, लेन कटिंग आणि भरधाव वाहनांवर मोठ्या संख्येने होत असलेली कारवाई, यामुळे अपघातांच्या संख्येत घट होत आहे. वाहतुकीशी संबंधित सर्वच घटक एकत्रित काही काळापासून कार्यरत असल्यामुळे प्राणांतिक अपघात घटले आहेत. 
- मिलिंद मोहिते, अधीक्षक, महामार्ग पोलिस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com