मोठी ब्रेकिंग! शासकीय मेगाभरती पुन्हा लांबणीवर; 'हे' आहे प्रमुख कारण 

2mega_bharti_0 (1) - Copy.png
2mega_bharti_0 (1) - Copy.png

सोलापूर : कोरोनाच्या वैश्‍विक संकटाचा फटका राज्याच्या तिजोरीला मोठ्या प्रमाणात बसला आहे. जून वगळता एप्रिल, मे, जुलै आणि ऑगस्ट या चार महिन्यांत करात तब्बल 39 हजार 170 कोटींची घट झाली आहे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळातील मेगाभरती ठाकरे सरकारच्या काळात पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता ही मेगाभरती पुढील वर्षी आर्थिक स्थिती सुधारल्यास जुलैनंतर होऊ शकते, असा विश्‍वास वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केला.

मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील बहुतांश उद्योग व व्यवसायाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सशर्त परवानगी दिली. माल वाहतूक सुरु झाल्याने तिजोरीला आधार मिळाला. जूनमध्ये लॉकडाउन शिथिल केल्यानंतर तिजोरीत 171 कोटींचा कर अधिक जमा झाला. जून 2019 मध्ये सरकारला 19 हजार 171 कोटींचा महसूल मिळाला होता. तर यंदा जूनमध्ये 19 हजार 344 कोटींचा महसूल मिळाला. त्यामुळे विस्कटलेली राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येण्यास मोठी मदत झाली. मात्र, चिंतेची बाब म्हणजे ऑगस्टमध्ये गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 13 हजार 917 कोटींची घट झाली आहे. तिजोरीत जमा होणारा महसूल घटल्याने वित्त विभागाने वैद्यकीय खर्चाशिवाय अन्य कोणत्याही खर्चावर निर्बंध घातले आहेत. दुसरीकडे जमा झालेला सर्वच महसूल कर्मचाऱ्यांचे वेतन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर खर्च होत असल्याचे वित्त विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. 

महिनानिहाय करवसुली अन्‌ घट (कोटींमध्ये) 

  • महिना   2019      2020      घट
  • एप्रिल    20,399   11,894   8,505
  • मे          23,969  10,584   13,385
  • जुलै       22,657  19,334    3,323
  • ऑगस्ट  29,657  15,740    13,917
  • एकूण    96,682  57,512    39,170
  •  

तिजोरीवर दरवर्षी आठ हजार कोटींचा भार
वैद्यकीय क्षेत्र वगळता अन्य कोणत्याही विभागाने नवी पदभरती करु नये, असा निर्णय वित्त विभागाने यापूर्वीच घेतला आहे. कोरोनामुळे राज्य सरकारच्या तिजोरीला फटका बसल्याचे प्रमुख कारण वित्त विभागाकडून सांगण्यात आले. लॉकडाउनमुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगारीत मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये वर्ग एक ते वर्ग चारची तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक पदे रिक्‍त आहेत. त्यापैकी 50 टक्‍के पदभरती केल्यानंतर तिजोरीवर दरवर्षी आठ ते दहा हजार कोटींचा भार पडणार आहे. सद्यस्थितीत तेवढा भार उचलणे सरकारला शक्‍य नसल्याने मेगाभरती आता पुढील वर्षीच होईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com