वैद्यकीय प्रवेशांना अखेर मुदतवाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 14 मे 2019

वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली.

मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली. अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश काढून त्यांचे प्रवेश नियमित करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. प्रवेशाचा उद्या (ता. 14) शेवटचा दिवस आहे. दरम्यान, प्रवेशाचा कालावधी वाढविण्याचे आदेश राज्य सरकार जोपर्यंत काढत नाहीत तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आझाद मैदानात ठाण मांडण्याचा निर्णय घेतला आहे. 

वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी भेट घेतल्यानंतर सांगितले की, मराठा आरक्षण कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. आचारसंहितेमुळे काही निर्णय घेता येणार नाहीत. तसेच, याप्रकरणी काही विद्यार्थ्यांची सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल झालेली आहे; त्याबाबतही निर्णय येणे अपेक्षित आहे. सगळ्या बाबी तपासून घेण्यासाठी थोडा वेळ हवा असल्याने या प्रवेश प्रक्रियेचा कालावधी वाढविण्याचा प्रयत्न करू, असे जाहीर केले. मात्र, याबाबतचे लेखी आदेश राज्य सरकार काढत नाही तोपर्यंत विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या संघटना आझाद मैदानातून हटणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार, कॉंग्रेसचे आ. भाई जगताप, शेकापचे आ. बाळाराम पाटील यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. तर, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने ठाण्यात राज ठाकरे यांची भेट घेत या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली. सरकारकडून आचारसंहितेचे कारण पुढे केले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्‍त निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांचीही भेट घेतली. 

गेल्या वर्षी सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेला मराठा आरक्षण लागू होणारच नव्हते, तर राज्य सरकारने प्रवेशच दिले का, असा प्रश्‍न आंदोलक विद्यार्थी विचारत आहेत. तसेच, राज्यातील आणि राज्याबाहेरीलही वैद्यकीय प्रवेशाची प्रक्रिया संपलेली असल्याने हे विद्यार्थी तीव्र संताप व्यक्‍त करीत आहेत. राज्य सरकारने या विद्यार्थ्यांची शासकीय महाविद्यालयातील व खासगी महाविद्यालयामधील शुल्काच्या फरकाची रक्‍कम स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्याचा निर्णय घेण्याची तयारी दाखविली. मात्र, प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयातच प्रवेश मिळावा, या अटीवर विद्यार्थी आंदोलक ठाम आहेत. 

""विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत सरकारने खेळू नये. याचे राजकारण न करता या मुलांना न्याय मिळण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी मी प्रयत्न करेन.'' 
अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते 

आझाद मैदानावर आंदोलन 
राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा या वर्षी फेब्रुवारीपासून लागू केला असल्याने गेल्या वर्षी सुरू झालेल्या परीक्षा प्रक्रियेला तो लागू न करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने मराठा आरक्षणाचा आधार घेत पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश घेतलेल्या जवळपास 213 विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे वैद्यकीय व दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 213 जागांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांसोबत मराठा आरक्षणात सहभागी झालेल्या संघटनांसह या विद्यार्थ्यांचे आंदोलन रविवारपासून आझाद मैदानात सुरू झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Extent of medical entrance